डोंबिवली : व्यावहारिक दृष्टीने गडकिल्ल्यांचे महत्त्व आज कमी वाटत असले तरी, स्वातंत्र्याची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व भावी पिढीपर्यंत पोहोचवावे, या हेतूने डावखरे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडतर्फे ‘अनुभवा ऐतिहासिक क्षण’ हे प्रदर्शन नुकतेच कल्याण-शीळ रस्त्यावरील विकोनाका येथे रिजन्सी निर्माणच्या भव्य पटांगणावर भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात ज्येष्ठ ऐतिहासिक वस्तुसंकलक गिरीश जाधव यांच्या सहकार्याने शिवकालीन हत्यारे, अवजारे व चलनी नाणी, महत्त्वाच्या गडकिल्ल्यांची सचित्र सविस्तर माहिती मांडण्यात आली होती. डोंबिवली, कल्याण व आसपासच्या ग्रामीण भागांतील शाळेमधील १४ हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती आयोजक संतोष डावखर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १५ बसची व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले.या प्रदर्शनासाठी सचिन चौधरी, वैभव सोवे, प्रवीण निरगुण, जगदीश म्हात्रे, प्रकाश थोरात, प्रमोद पवार, नरेश म्हात्रे यांनी मेहनत घेतली. आमदार गणपत गायकवाड, नगरसेवक नितीन शिंदे, कुणाल पाटील यांनी प्रदर्शनाला भेट दिली. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात अनुभवले ऐतिहासिक क्षण
By admin | Published: February 07, 2017 3:56 AM