प्रलंबित शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो शैक्षणिक आर्थिक अडचणींचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:05 AM2021-06-30T04:05:57+5:302021-06-30T04:05:57+5:30

मुंबई विभागीय स्तरावर २०१९-२० मधील तीन हजारांहून अधिक अर्ज अद्याप प्रलंबित लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील ...

Students face academic and financial difficulties due to pending scholarships | प्रलंबित शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो शैक्षणिक आर्थिक अडचणींचा सामना

प्रलंबित शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो शैक्षणिक आर्थिक अडचणींचा सामना

Next

मुंबई विभागीय स्तरावर २०१९-२० मधील तीन हजारांहून अधिक अर्ज अद्याप प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयांनी या विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जांतील त्रुटींची पूर्तता झाली नाही. परिणामी हे अर्ज महाविद्यालयात पडून असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. मुंबई विभागात २०१९-२० शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण पात्र ३८ हजार ७६३ अर्जांपैकी ३ हजार ४८६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा समावेश आहे.

राज्याचा विचार केला असता मागील वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी शासनाकडून तब्बल १७१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामधील १०५३ कोटींच्या शिष्यवृत्तीचा लाभ २६६०१३ लाभार्थी विद्यार्थ्यांना झाला होता. मात्र २०२०-२१ वर्षात शासनाकडून प्राप्त तरतूद थेट ३७२ कोटींवर घसरली असून, यातून केवळ १५६४५३ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होऊ शकल्याची माहितीही माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकल्याने शिष्यवृत्ती मिळण्यात खंड पडला आहे. बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर केले नसल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयेदेखील बंद होती. मात्र, आता बहुतेक महाविद्यालयातील कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असतील, त्यांनी आज, ३० जूनपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे

* त्रुटीची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित

कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक विद्यार्थी गावाकडे गेले होते. त्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये त्रुटी होत्या. या त्रुटींची पूर्तता वेळेत झाली नाही. परिणामी हे अर्ज महाविद्यालआच्या स्तरावर प्रलंबित राहिले आहेत. या अर्जांतील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर ते समाजकल्याण विभागाकडे दाखल होते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

* शिष्यवृत्ती न मिळाल्याने हतबल

शिष्यवृत्ती कधी मिळणार?

शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून महाविद्यालयात सादर केला आहे. महाविद्यालयाने तो समाजकल्याण विभागाकडे पाठविला असल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

- विद्यार्थी

..... .....

शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरला आहे. मात्र, अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही. महाविद्यालय बंद असल्याने कमवा व शिका योजनेचे मानधनही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती लवकर मिळायला हवी.

- विद्यार्थी

कोट

शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात उच्च शिक्षण विभाग अपयशी ठरत आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित राहण्यास, रद्द होण्यास अनेक संस्थाच जबाबदार आहेत. त्यामुळे अशा शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, ती तत्परतेने व्हावी.

- अमर एकाड, अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना

-------------------------

अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतनाची अर्जस्थिती २०१९-२०

मुंबई विभाग -अर्ज नोंदणी - पात्र अर्ज - संस्था स्तरावर प्रलंबित - जिल्हास्तरावर प्रलंबित- एकूण वाटप प्रलंबित

मुंबई उपनगर -१००९९-७९६०-१३६-१-७८९

रायगड- ५९२७-५०१९-६४-६-४३९

रत्नागिरी - ३९७५-३४२१-७०-१-३४०

सिंधुदुर्ग -१७७१-१५६८-१८-३-६४

ठाणे - १५८७६-१३१२१-१५७-६-११५३

मुंबई शहर - ७२४४- ५६१८-५९-६४१७

पालघर - २४७८-२०५६-१३-०-२८४

एकूण - ४७३७०-३८७६३-५१७-२३-३४८६

..........................................

Web Title: Students face academic and financial difficulties due to pending scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.