भांडुपमधील महाविद्यालयात असुविधांमुळे विद्यार्थ्यांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:03 AM2020-01-10T02:03:44+5:302020-01-10T02:03:48+5:30
नामांकित महाविद्यालयाची पाटी आह़े
मुंबई : नामांकित महाविद्यालयाची पाटी आह़े मात्र महाविद्यालयात आवश्यक आणि महत्त्वपूर्ण अशा विषयांसाठी प्राध्यापकच उपलब्ध नसतील तर या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आपले शिक्षण कसे पूर्ण करणार, हा मोठा प्रश्न आहे. ही परिस्थिती भांडुप येथील श्रीराम महाविद्यालयाची असून, प्राध्यापकच नसल्याने अनेक विषयांच्या तासिकाच होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. सोबतच या महाविद्यालयातील अनेक असुविधांचा पाढाच विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांसमोर वाचून दाखवत आहेत़ आवश्यक ते शुल्क भरूनही त्यांना सुविधा न मिळाल्याने त्यांची होणारी कोंडी फोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वेळेवर शुल्क भरूनही आवश्यक त्या सोयीसुविधा न मिळाल्याने भांडुप येथील सायन्स आणि कॉमर्सच्या श्रीराम महाविद्यालयातील विद्यार्थी त्रस्त आहेत. एकीकडे प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही़ दुसरीकडे महाविद्यालयात स्वच्छतागृहे अस्वच्छ असणे, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन नसणे, इतकेच काय तर बसण्यासाठी स्वच्छ आसनव्यवस्थाही नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी असलेले कॉमन रूमही बंद ठेवण्यात आले आहेत़ पिण्याच्या वॉटर फिल्टर्सचाही अभाव महाविद्यालयात असल्याची माहिती युवासेनेचे सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि तक्रारी युवासेनेकडे मांडल्यानंतर युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला भेट देत तेथील प्राचार्यांच्या नावे निवेदन दिले असल्याची माहिती थोरात यांनी दिली. सोबतच विद्यार्थ्यांच्या समस्या आणि तक्रारी लवकर सोडवाव्यात, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.