मुंबई : क्लस्टर महाविद्यालयांमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार नाही, या विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेचा आधार घेत, बोरीवली येथील एका विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा देण्यास नकार दिला आहे. एटीकेटीच्या परीक्षेत २५ प्रश्नांमध्ये ८ प्रश्नांची पुनरावृत्ती होऊनही विद्यार्थ्याला बेनिफिट ऑफ डाउटचा अधिकारही नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्याने यासंदर्भात विद्यार्थी संघटनेकडे तक्रार केली आहे.
एलएलबी तिसऱ्या वर्षाची परीक्षा देणारा हा विद्यार्थी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट या विषयाचा पेपर देणारा एकमेव विद्यार्थी विद्यापीठाने तयार केलेल्या क्लस्टरमध्ये होता. मात्र ८ प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने १६ प्रश्नांची उत्तरे देताना त्याची गडबड झाली आणि त्याने परीक्षेवेळी निदर्शनास आणूनही महाविद्यालयाकडून दुर्लक्ष केले गेले असे म्हणणे त्याने विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महाविद्यालयाने प्रश्नांच्या पुनरावृत्तीची चूक लिखित स्वरूपात मान्य करूनही विद्यापीठ नियमानुसार त्याची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया सदर विद्यार्थी व मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे याना दिली. विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या चुकीची शिक्षा मिळणार असली तर त्याच्या शैक्षणिक नुकसानीला विद्यापीठ कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया गांगुर्डे यांनी दिली.
ऑनलाइन परीक्षेसाठी सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या, मग सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पेपर अपलोड होण्याआधी नियमित नियमाप्रमाणे त्यांची तपासणी का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे प्रश्नांची पुनरावृत्तीही टाळली गेली असती, त्यामुळे विद्यापीठाचा व महाविद्यालयाचा हा निष्काळजीपणा असल्याचे मत त्यांनी मांडले. महाविद्यालयाच्या प्रचार्यांशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांला पुनरावृत्ती झालेल्या ८ प्रश्नांपैकी एकाचेही उत्तर आले नाही, त्यामुळे त्याला कोणत्या आधारावर बेनिफिट ऑफ डाउट द्यावा, असा प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाकडून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर नक्कीच आम्ही यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.