परीक्षेत विद्यार्थ्यांचा ‘नीट’ गोंधळ
By admin | Published: May 8, 2017 05:14 AM2017-05-08T05:14:01+5:302017-05-08T05:14:01+5:30
‘नीट’ परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा पत्ता असल्याने, १५० ते २०० विद्यार्थ्यांना रविवारी येथे मोठा मनस्ताप सहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘नीट’ परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा पत्ता असल्याने, १५० ते २०० विद्यार्थ्यांना रविवारी येथे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना तब्बल ७० किलोमीटरचा फेरा पडला. अनेकांना केंद्रावर पोहोचण्यात उशीर झाल्याने मोठा गोंधळ उडाला. राज्यातील अनेक ठिकाणी गोंधळाचीच स्थिती कायम होती.
पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील एकलव्य निवासी शाळेतील ‘नीट’च्या (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षा केंद्राचा पत्ता एकलव्य रेसिडेंसिअल स्कूल, मुंढेगाव (ता. इगतपुरी), गव्हर्नमेंट सर्व्हंट क्वाटर्स, ट्रायबल कॉलनी असा होता.
नाशिकहून इगतपुरी पुन्हा नाशिक
दहा वाजताच्या परीक्षेसाठी केंद्रावर साडेसात वाजता उपस्थिती नोंदविण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे मुंढेगावात गेलेल्या विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. मिळेल ते वाहन पकडून त्यांनी पुन्हा ३५ किमीवरील नाशिकचे केंद्र गाठले. तेथे सव्वादहा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आले.
शर्टाच्या बाह्या कापून दिली परीक्षा
ड्रेसकोडची माहिती नसल्याने, काही विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये एका केंद्रावर चक्क शर्टाच्या लांब बाह्या कापून परीक्षेला सामोरे जावे लागले.
नागपूरमध्ये ‘आधार कार्ड’ न आणल्यामुळे अनेकांना केंद्रावर प्रवेश मिळाला नाही. काही विद्यार्थी स्लीपरऐवजी सँडल, बूट, तसेच चप्पल घालून आले होते. त्यांना ते बाहेर काढावे लागले.