राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या आराखड्याची मागणी : इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम बदलाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमावरून राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांसारख्या इतर मंडळांच्या विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आणि मतभेद आहेत. याच पार्श्वभूमीवर सीईटीच्या परीक्षेत मंडळाच्या अभ्यासक्रमातील फरकामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे तर पडणार नाहीत ना, अशी भीती आता पालकांसह मुख्याध्यापकांकडूनही व्यक्त होत आहे.
शिक्षण मंडळाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंचाची तयारी करावी किंवा त्यांना अभ्यासक्रम, प्रश्नांचा आराखडा समजावून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे. राज्य मंडळाच्या बोर्डाचा दहावीचा अभ्यासक्रम हा इतर बोर्डांच्या तुलनेत दोन वर्षे मागे आहे. त्यामुळे तो अभ्यासणे, संकल्पना समजणे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी फारसे अवघड नाही. उलट आतापर्यंत दहावीसाठी दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी केलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना आता बहुपर्यायी उत्तरांची तयारी करणे अवघड जात असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली. विद्यार्थी, पालक शिक्षकांकडे आणि मुख्याध्यापकांकडे तयारी कशी करावी? प्रश्न कसे असतील, काठिण्यपातळी कशी असेल, अशा प्रश्नांची विचारणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एससीईआरटी आणि शिक्षण मंडळाने याबाबतीत उपाययोजना करून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला कमी गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाच्या स्पर्धेत आपण मागे पडू, अशी भीती वाटत असताना दुसरीकडे इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही आपला दहावीचा अभ्यासक्रम वेगळा असताना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी कशी देणार? असा प्रश्न पडला आहे. सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ठेवणे, हा भेदभाव आहे. यासंदर्भात इतर मंडळांसाठी राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी का, अशी विचारणा करणारी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.