Join us  

शाळा बंदमुळे परीक्षांचा निर्णय विद्यार्थ्यांना वाटतो अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

३१ टक्के मुले मानसिक तणावाखालीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, ठाणे येथील तब्बल ९२ टक्के विद्यार्थी सद्यस्थितीत शाळा, ...

३१ टक्के मुले मानसिक तणावाखाली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई, ठाणे येथील तब्बल ९२ टक्के विद्यार्थी सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालयांच्या ऑनलाईन तासिकांद्वारे शिक्षण घेत आहेत तर ७.३ टक्के विद्यार्थी इतर माध्यमातून शिक्षण घेत आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही या क्षेत्रात शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नसताना राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी बोर्डांच्या प्रचलित पद्धतीत कोणताही बदल न करता परीक्षा जाहीर केल्याने ६२.३ टक्के विद्यार्थ्यांना ही बाब अन्यायकारक वाटत असल्याचे मत त्यांनी सर्वेक्षणातून मांडले.

वर्षभर फक्त ऑनलाईन अभ्यास करून आपण बोर्डाच्या परीक्षा उत्तमरितीने देऊच शकत नसल्याचे मत ७९.८ टक्के विद्यार्थ्यांनी मांडले. त्यातील ५०.२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा नकाेच, असे ठामपणे सांगितले, तर २९.६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

इतर जिल्ह्यांतील शाळा सुरू आहेत व आपल्या जिल्ह्यातील नाहीत, या विचाराने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. १४ टक्के विद्यार्थ्यांच्या मनात भीती व परीक्षेचे दडपण आहे, तर १२.५ टक्के विद्यार्थ्यांना आपण परीक्षेत इतरांच्या तुलनेत मागे पडू, असे वाटत आहे. भविष्यात महाविद्यालय निवडताना कमी गुणांमुळे हवी ती शाखा निवडता येणार नाही, अशी भीती १६.६ टक्के विद्यार्थ्यांना वाटत आहे तर ७.३ टक्के विद्यार्थ्यांनी आपण परीक्षा देण्याचा आत्मविश्वासच गमावल्याचे नमूद केले. तब्बल ३१.८ टक्के विद्यार्थी वरीलपैकी सर्वच भावना व्यक्त करत आहेत.

* ऑनलाईन परीक्षांचा पर्याय योग्य

मार्च २०२०मध्ये लॉकडाऊननंतर वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने परीक्षा ऑनलाईनच घ्यायला हव्यात, असे मत ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सध्याच्या प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० टक्के गुण बोर्डाने शाळेतील अंतगर्त मूल्यमापनांतर्गत, तर ५० टक्के लेखी परीक्षेसाठी ठेवावे, असे मत तब्बल ८२.८ टक्के विद्यार्थ्यांनी नाेंदवले.

कुर्ल्यातील गांधी बालमंदिर माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणारे जयवंत कुलकर्णी यांनी हे सर्वेक्षण केले. यामध्ये हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मते मांडली.

* सर्वंकष मूल्यमापनाची कसोटी

बोर्डाची परीक्षा जाहीर करताना विभागाने सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांचा समान पद्धतीने विचार करणे अपेक्षित होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थी शाळा सुरू नसल्याने परीक्षांसंदर्भात प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. शिवाय प्रचलित पद्धतीपेक्षा ऑनलाईन, ऑफलाईन, संमिश्र परीक्षा पद्धतीचा, अंतर्गत मूल्यमापनाचा विचार यंदाच्या वर्षासाठी बोर्डाने केला असता तर विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला असता. परीक्षा ही केवळ पारंपरिक पद्धती नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनाची कसोटी आहे, हे बोर्डाने लक्षात ठेवायला हवे.

- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक व शिक्षक