विद्यार्थ्यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 06:01 AM2017-08-15T06:01:39+5:302017-08-15T06:01:42+5:30
मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, विद्यापीठात, महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.
मुंबई : भारत ७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, विद्यापीठात, महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने निकालाची १५ आॅगस्टची तिसरी डेडलाइनही चुकवून लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे.
मुंबई विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्वसाधारणपणे १० ते १५ टक्के विद्यार्थी हे देशांतर्गत अन्य विद्यापीठात अथवा परदेशात शिक्षणासाठी जातात. देशात अथवा परदेशातील अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी पदवीच्या तिसºया वर्षापासून विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. अन्य ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंतची मुदत असते. पण आता १३ आॅगस्टपर्यंत फक्त ३२० निकाल जाहीर झाले असून अजूनही १५७ निकाल जाहीर झालेले नाहीत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
अभियांत्रिकी आणि विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. वाणिज्यचे निकाल जाहीर झाले नसल्याने एमबीएचे प्रवेश रखडले आहेत. या सर्व प्रकारांना कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार असल्याची टीका केली जात आहे.
दरम्यान सोमवारी ३३१ निकाल जाहीर करण्यात आले असून अजूनही १४६ निकाल बाकी आहेत.
>विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
अनेक विद्यार्थी आता करायचे काय, याच संभ्रमात आहेत. कारण, दुसºया विद्यापीठात अथवा परदेशातील महाविद्यालयांत त्यांना प्रवेश मिळाला आहे. पण पदवीचा निकाल हाती नसल्याने पुढची प्रक्रिया करता येत नाही. व्हिसासाठी विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिकेची मागणी केली जात आहे. पण निकालच जाहीर झाला नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. अनेकांना मुंबई विद्यापीठातच पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. पण वर्ष सुरू कधी होणार? अभ्यास कधी करायचा, असा प्रश्न पडला आहे.
>आता निकालाची कोणतीच तारीख नाही...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी आणून विद्यार्थ्यांचा चांगलाच खोळंबा केला आहे. आॅगस्ट महिन्याची १५ तारीख उजाडूनही, अद्याप सव्वा लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. मुंबई विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठाला दोन डेडलाइन दिल्या होत्या. मग विद्यापीठाने एक डेडलाइन जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आशा होती, पण आता विद्यापीठाने निकालाची कोणतीच तारीख जाहीर करण्यास नकार दिला आहे. आता लवकरच निकाल लावू, असा विद्यापीठाचा पवित्रा असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
जून महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना निकाल लागतील, अशी आशा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे राज्यपालांनी ३१ जुलैची तारीख दिली. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला होता, पण आता सर्वांचा ताण वाढला आहे. मंगळवार, १५ आॅगस्टची डेडलाइन संपण्याआधीच प्रभारी कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे यांची विद्यार्थी संघटनांनी भेट घेतली. मनविसेचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटायला गेले होते. या वेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. लवकरात लवकर निकाल जाहीर करू. काम सुरू आहे, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी दिली.
स्टुडंट लॉ कौन्सिलनेही प्रभारी कुलगुरूंची भेट घेतली. या वेळी त्यांनी निवेदन दिले. यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे, ३५ ते ४५ मध्ये मॉडरेशन न करता, नापास विद्यार्थ्यांचे १०० टक्के मॉडरेशन करावे. म्हणजे निकालात होणारे गोंधळ कमी होतील, तसेच शैक्षणिक वर्षाचे दोन महिने संपत आले, तरी निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, पुनर्मूल्यांकन मोफत करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल.
डीवायएफआय आणि एसएफआयच्या शिष्टमंडळाने कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले. प्रवेशद्वारावर निदर्शने केली. रस्ता रोखला होता. विद्यापीठात रखडलेले निकाल लावा, अशी प्रमुख मागणी होती.