Join us

शाळेच्या ढिगाऱ्यावर विद्यार्थ्यांनी केले ध्वजारोहण

By admin | Published: August 19, 2015 2:25 AM

स्वातंत्र्यदिनी जमीनदोस्त करण्यात आलेल्या चांदिवली येथील शाळेच्या ढिगाऱ्यावर विद्यार्थ्यांनी शनिवारी ध्वजारोहण केले. ध्वजवंदन करताना विद्यार्थी

मुंबई : स्वातंत्र्यदिनी जमीनदोस्त करण्यात आलेल्या चांदिवली येथील शाळेच्या ढिगाऱ्यावर विद्यार्थ्यांनी शनिवारी ध्वजारोहण केले. ध्वजवंदन करताना विद्यार्थी व पालकांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यातूनही शाळा नव्याने उभी करण्याचा निर्धार या वेळी विद्यार्थी व पालकांनी केला.अंधेरी पूर्व येथे सेंट पॉल इंग्लिश स्कूल होती. येथे पाचवीपर्यंत वर्ग होते. तीनशे विद्यार्थी व सहा शिक्षक येथे होते. काही दिवसांपूर्वी एका खासगी विकासकाच्या दबावामुळे शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तरीही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी येथे शाळेच्या ढिगाऱ्यावर ध्वजारोहण करण्याचे ठरवले व शनिवारी सकाळी विद्यार्थी, पालक व शिक्षक तेथे एकत्र आले. ध्वजंवदन झाल्यानंतर या सर्वांनी ‘डरेंगे नही लढेंगे’ अशी घोषणा देत शाळा नव्याने उभारण्याचा निर्धार केला.येथील विकासकाच्या दबावामुळे दोन शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली होती. त्यापैकी कुशाभाऊ बांगर शाळेला अभय मिळाले आहे, तर सेंट पॉल शाळा पाडण्यात आली. त्यामुळे येथील शेकडो विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची मुले या शाळेत शिकत होती. शाळा बंद झाल्याने आता या मुलांना कोठे शिकवायचे, असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे. त्यातूनही विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी शाळेच्या ढिगाऱ्यावर ध्वजारोहण केले. (प्रतिनिधी)