Join us

विद्यार्थ्यांची माहिती खासगी कोचिंग क्लासेसकडे, पालकांसह संघटनांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:28 AM

काही अनोळखी क्रमांकांवरून कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासंदर्भात सतत येणाऱ्या मेसेजेस् आणि फोनमुळे पालक त्रासले आहेत.

मुंबई - काही अनोळखी क्रमांकांवरून कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासंदर्भात सतत येणाऱ्या मेसेजेस् आणि फोनमुळे पालक त्रासले आहेत. या मेसेजेस् आणि कॉल्सवरून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खासगी कोचिंग क्लासेसला मिळत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती अशा प्रकारे सहज इतरांना मिळत असल्याने इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी बालहक्क आयोगाकडेसुद्धा तक्रार करणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी दिली आहे.आपल्या पाल्याची सर्वच्या सर्व वैयक्तिक माहिती कोचिंग क्लासेस चालकांना मिळत असल्याची तक्रार मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पालक करत असल्याची माहिती इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनकडून मिळाली आहे. यानिमित्ताने अनेक नामांकित शाळा विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती कोचिंग क्लासेसना पुरवित असल्याचा आरोपही पालकांकडून होत आहे. यासंदर्भात कोचिंग क्लासेसला पुन्हा कॉल करून माहिती कुठून मिळाली याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिल्याचे सहाय यांनी सांगितले.विशेष म्हणजे मुंबई, पुणे, दिल्लीतील काही पालकांच्या मोबाइलवर कोचिंग क्लास चालकांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या क्लासचालकांना विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, शाळेचे नाव, विद्यार्थी शिकत असलेली इयत्ता आदी माहिती तोंडपाठ असून ते पालकांना पाल्याला कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन करीत आहेत. विद्यार्थ्यांची एवढी माहिती यांच्याकडे कशी आली, असा सवाल यानिमित्ताने सर्वच् स्तरातून उपस्थित केला जात आहे.अनेक नामांकित शाळांनी आपले अ‍ॅप तयार केले असून त्यात विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरून घेतली जात आहे. त्यामुळे हा डाटा कोचिंग क्लासेसच्या हातीतर लागत नाही ना, याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. मात्र शाळासुद्धा माहिती दिली नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे यासंदर्भात पालकांनी बालहक्क आयोगाकडे तक्रार कण्याचे ठरविले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक किंवा आधार कार्डवरील माहिती कुठेही उघड होता कामा नये. मात्र तरीही या निर्देशांचे उल्लंघन करून हा प्रकार कसा घडतो? याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून माहिती मिळविणे गरजेचे आहे.- अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन 

टॅग्स :शिक्षण क्षेत्र