लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळेत जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याची शिवडी भागातील शाळकरी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील विद्यार्थ्यांना तसेच प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना इस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांडून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. या ठिकाणी अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी २०१८ साली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या वतीने या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात अली.
पत्रव्यवहार केलाया सेवेचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत महापौर बंगल्याच्या ठिकाणी झाला होता. मात्र, ऑगस्टपासून बससेवा खंडित करण्यात आली, असे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. या संदर्भात सप्टेंबर महिन्यात पालिकेशी पत्रव्यवहार केल्यानंतर थोड्याच दिवसात बससेवा सुरू होईल, असे आश्वासन पालिकेने दिले. मात्र, आजतागायत बससेवा सुरू झालेली नाही, याकडे पडवळ यांनी लक्ष वेधले.
सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही हा विभाग प्रचंड रहदारीचा असून याच ठिकाणी शिवडी-न्हावा शेवा पुलाचे काम सुरू आहे. हा विभाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित असल्याने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही. भारत पेट्रोलियम तसेच अन्य पेट्रोलियम कंपन्या या भागात असल्याने मोठ्या प्रमाणावर टँकरची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, असे सांगतानाच बससेवा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पडवळ यांनी दिला.