एलएलएमचे विद्यार्थी तणावात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:39 AM2018-05-02T06:39:24+5:302018-05-02T06:39:24+5:30
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाचा सर्वाधिक फटका विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाचा सर्वाधिक फटका विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसमोर निकालाची चिंता कायम असताना, आता एलएलएमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा घोळ समोर आला आहे. एलएलएम अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर १ आणि २च्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने, विद्यार्थ्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा धारण करीत आंदोलनावर ठाम असल्याचे मंगळवारी जाहीर केले. या संदर्भात ५ मे रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे देण्यात आली आहे.
तब्ब्ल १३० दिवस उलटूनसुद्धा विधि शाखेचे निकाल जाहीर करण्याची तसदी विद्यापीठ घेताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील विधि शाखेच्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत असल्याची भावना स्टुडंट लॉ कौन्सिलकडून व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेशही उशिरा सुरू झाले होते. प्रवेश सुरू झाल्यानंतर १० दिवसांत परीक्षा जाहीर केल्याने परीक्षा कशी देणार, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर पडला होता. या विरोधात काही विद्यार्थी न्यायालयात गेले होते. या वेळी न्यायालयाने निर्णय देताना इच्छुक विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी आणि इतर विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र, विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता कुठली परीक्षा देणार, असा प्रश्न पडल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.
विद्यापीठाने परीक्षेसाठी केलेल्या या घाईमुळे विद्यार्थी तणावात आहेत. त्यांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लागले आहे. त्यामुळेच हे वेळापत्रक बदलूल विद्यार्थ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, त्यासाठीच विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.