मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ महिन्याभरापूर्वी पार पडला. मात्र बीएलएस (६ वे सेमिस्टर) आणि एलएलबी (चौथे सेमिस्टर) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप पदवी प्रमाणपत्रांचे वितरणच करण्यात आलेले नाही. यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी केल्या असून विद्यार्थी संघटनांकडेही धाव घेतली आहे.मागील वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना या पदव्या मिळत होत्या. मात्र यंदाच्या दीक्षान्त समारंभाच्या शेवटच्या क्षणी या पदव्या राखून ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेतला गेला.लॉच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी मुंबई विद्यापीठ सुरुवातीपासून खेळत असून हा प्रकार म्हणजे त्यांची अडवणूक असल्याची प्रतिक्रिया स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली आहे. कुलगुरूंना विद्यार्थ्यांची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर त्यांनी पदावरून बाजूला व्हावे, असेही ते म्हणाले. तर विद्यार्थ्यांची लॉ प्रमाणपत्रे मिळण्यासाठी पिटीशन साइन करण्याची मोहीम महाराष्ट्र स्टुडण्ट लॉ असोसिएशनने हाती घेतली असून त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले असल्याची माहिती सिद्धार्थ इंगळे यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठाची प्रमाणपत्राच्या संदर्भातील निर्णयाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांची निवेदने विद्यापीठाकडे आली आहेत. या साऱ्याचा विचार करून लवकरच प्रमाणपत्रांच्या बाबतीतील निर्णय अपेक्षित आहे.- विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क), मुंबई विद्यापीठ
दीक्षान्त समारंभाला महिना उलटूनही लॉचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:37 AM