लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा सर्वांत मोठा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याच्या प्रतिक्रिया या समाजातील विद्यार्थ्यांनी दिल्या. यामुळे सर्व प्रकारच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी गुणवत्ता असूनही मागेच राहणार, अखी खंत त्यांनी व्यक्त केली.
मागील वर्षी मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अकरावी, अभियांत्रिकी, पदवी प्रवेश, आयटीआय प्रवेश अशा सर्व प्रवेश प्रक्रियांना खीळ बसली होती. मात्र आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. तरीही सामाजिक, शैक्षणिक मागास वर्गातून (एसईबीसी) प्रवेश घेणाऱ्यांना याचा फटका बसला. आरक्षणच रद्द केल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत निभाव कसा लागणार? गुणवत्ता असूनही आयटीआय, अभियांत्रिकी, नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून त्यांना दूरच राहावे लागणार, अशी नाराजी या विद्यार्थ्यांमध्ये आहे.दरम्यान, आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल, पदभरतीतील नियुक्त्या रोखून ठेवल्या आहेत. नियुक्त्या गेल्या २ वर्षांपासून रखडल्या आहेत, काहीच चूक नसताना त्यांना त्रास का, असा प्रश्न एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी उपस्थित केला.
हक्कांच्या जागांची गरजआतापर्यंत विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातील जागेमधून अर्ज व प्रवेशाच्या संधीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला हाेता. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या जागांची गरज असल्याने राज्य सरकारने आरक्षणासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना थेट एसईबीसी किंवा मग काहीच होत नसेल तर ओबीसीमधील आरक्षणातून जागा उपलब्ध करून आरक्षण द्यावे.- राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती