विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी आणावी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:06 AM2019-12-19T07:06:11+5:302019-12-19T07:06:23+5:30
पालक संघटनांची मागणी; मुलांकडून होतोय सोशल मीडियाचा गैरवापर
मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरील वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून, याचे व्हॉट्सअप आणि चॅटिंग अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे इतर विद्यार्थ्यांशी असणारे गैरवर्तनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. याचा विद्यार्थ्यांची भाषा आणि वर्तणुकीवरही वाईट परिणाम होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघटनेने राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय महिला व बाल विकास आयोगाकडे देशातील सर्व राज्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालून त्याची नियमावली अधिक कडक करावी व त्याची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणी पत्र लिहून केली आहे. मोबाइलप्रमाणेच विद्यार्थ्यांना सोशल मीडियाला एक्सेस देणाऱ्या इतर गॅजेट्सवरही बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अनेक पालक मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना सामान्य ज्ञान मिळावे, यासाठी त्यांच्या हातात शाळेत जाताना मोबाइल देतात. मात्र, याचा विद्यार्थी गैरवापर करतात. शाळेत तास सुरू असताना मोबाइलवर गेम्स खेळत बसणे, शाळा चालू असताना मित्रांशी विनाकारण गप्पा मारणे, वर्गात शिक्षक नसताना मोबाइलचा आवाज करणे किंवा दुसºया मुलांसमोर उगाचच छाप पाडणे, असे प्रकार शाळांमध्ये विशेषत: खासगी आणि मोठ्या शाळांमध्ये सर्रास सुरू आहेत. एवढेच नाही, तर शिक्षकांना कोणी सांगितल्यास त्या मुलाला दम भरण्याचे प्रकारही घडत आहेत. वर्गातील इतर विद्यार्थी विशेषत: विद्यार्थिनीसोबत अश्लील चॅटिंग आणि तत्सम प्रकारातून करत असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने सर्व राज्यांतील पोलीस विभागांना विशेषत: सायबर क्राइम विभागाने कोणत्याही शाळा-विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल किंवा टॅब घेऊन येऊ देणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळांवर सोपवावी, अशी मागणी केली आहे. पोलीस आणि सायबर क्राइम यंत्रणांनी शाळांमध्ये याची अंमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी, अशी मागणीही इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशनने केली आहे.
... अन्यथा आळा घालणे कठीण
शालेय विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावरील वावर आणि त्यातून आपल्या सहकाऱ्यांशी गैरवर्तणूक हा आजार कॅन्सरसारखा पसरत आहे. आताच संबंधित यंत्रणांनी यावर कडक कारवाई करावी. यावर नियंत्रण न आणल्यास पुढील काही वर्षांत याला आळा घालणे कठीण होणार आहे.
- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशन
आठ विद्यार्थी निलंबित : मुंबईतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाºया परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपल्या वर्गमित्रांवर हिंसक आणि लैंगिक टीका करणाºया १३ ते १४ वयोगटांतील ८ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. वर्गातील दोन मुलींच्या पालकांनी ग्रुपवरचे मेसेज वाचले आणि शाळेकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मात्र, या प्रकरणातील शाळा आणि पालक यांपैकी कोणीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.