मुंबई : सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारून नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवा, या व अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि तरुण बेरोजगारांनी विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया यांनी हे आंदोलन आयोजित केले आहे. त्यात पोलीस परवानगीविनाच शेकडो तरुण आझाद मैदानापासून विधिमंडळावर २३ मार्चला धडकणार असल्याची माहिती संघटनेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.राज्यात ३ लाखांहून अधिक नोंदणीकृत जागा रिक्त असून, त्या तातडीने भरण्याची संघटनेची प्रमुख मागणी असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत संघटनेने स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटीकरण न करता, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांऐवजी नव्या उमेदवारांना संधी देण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. शैक्षणिक सुविधांबाबत बोलताना संघटनेने सरकारी शाळा बंद करण्याचे कारस्थान थांबविण्याची मागणी केली आहे. शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने तत्काळ रद्द करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे; तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाºया शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
शैक्षणिक सुविधांसाठी उद्या विधिमंडळाला घालणार घेराव, विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:29 AM