विद्यापीठाविरोधात विद्यार्थ्यांची चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:29 AM2018-04-02T05:29:29+5:302018-04-02T05:29:29+5:30
मुंबई विद्यापीठाविरोधात वारंवार आंदोलन केल्यानंतरही प्रशासन मागण्यांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आता प्रतिकार चळवळ उभारली आहे. या चळवळीअंतर्गत विद्यापीठाच्या कलिना संकुलाचे मुख्य द्वार रोखून जाहीर निषेध करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
मुंबई - मुंबई विद्यापीठाविरोधात वारंवार आंदोलन केल्यानंतरही प्रशासन मागण्यांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आता प्रतिकार चळवळ उभारली आहे. या चळवळीअंतर्गत विद्यापीठाच्या कलिना संकुलाचे मुख्य द्वार रोखून जाहीर निषेध करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. मंगळवारी, ३ एप्रिलला दुपारी १२ वाजता स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया आणि आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यर्थी संघटनांनी या लढ्याला समर्थन दिले आहे.
याआधी कलिना प्रांगणात विद्यार्थ्यांनी दोन वेळा मोर्चे काढून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात मिळालेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी वाटही पाहिली. मात्र त्यानंतरही कुलगुरू, निबंधक आणि एकूण प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी पडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या मागण्यांत अवाजवीरीत्या वाढवलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम १ हजार ५०० रुपयांवरून पूर्वीप्रमाणे सर्व ६६० रुपये करावे, ही आहे. सर्व विभागांत समान पुनर्रचना करण्याचे आवाहनही यापूर्वीच करण्यात आले आहे. मात्र मागणी पूर्ण करणे दूरच, तर एकाएकी चर्चा थांबवून प्रशासनाने विद्यार्थ्यांचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबतच कुलगुरूंना विचारणा केली असता, विद्यार्थ्यांना अपमानास्पद दिल्याचा आरोपही केला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचा संयमाचा बांध फुटला असून परीक्षा शुल्कावर बहिष्कार टाकत प्रतिकार चळवळीची हाक दिली आहे.