प्रात्यक्षिक परीक्षेला पोहोचू न शकलेल्या एमएस्सीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:06 PM2018-07-09T17:06:46+5:302018-07-09T17:06:58+5:30
त्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार आहे
मुंबई : मुंबई व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने आज असलेल्या एमएससी सत्र २ व ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहचू शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार आहे व एमए समाजशास्त्र सत्र ३ची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. या दोन्ही परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
आज ९ जुलै २०१८ रोजी सकाळच्या सत्रात एमएससी सत्र २ व ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षा होत्या. या परीक्षा बॅचनुसार असल्याने काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सकाळीच पोहोचले. तर अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत. या प्रात्यक्षिक परीक्षा ६ जिल्ह्यांतील ४५ परीक्षा केंद्रावर होत्या.
आजच्या एमएस्सी सत्र-२ च्या प्रात्यक्षिक परीक्षामध्ये बॉटनी, एनव्हॉरमेंटल सायन्स, आयटी, फिजिक्स, स्टॅटीस्टिकस तसेच एमएस्सी सत्र ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षामध्ये बॉटनी, केमिस्ट्री (अनॅलिटीकल), केमिस्ट्री ( इनऑरगॅनिक) केमिस्ट्री (फिजिकल), एनव्हॉरमेंटल सायन्स, नुट्रोसेटिकल्स, फिजिक्स, झूलॉजी (बायोटेक्नॉलॉजी), झूलॉजी (ओशिनोग्राफी ), झूलॉजी(एंडोक्रिनॉलॉजी) या अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा त्या त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रावर होत्या. तसेच विद्यापीठातील समाजशास्त्र या पदव्युत्तर विभागाच्या एमए ऑनर्स सत्र ३ च्या समाजशास्त्र या विषयाची लेखी परीक्षा होती. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेस २ विद्यार्थी बसले होते.
साधारणतः किती विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, याचा आढावा विद्यापीठ घेत आहे. आज जे विद्यार्थी परीक्षेस पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहो याची दक्षता विद्यापीठ घेत आहे.