मुंबई मनपा शाळांतील विद्यार्थी गळती सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 03:24 PM2017-12-12T15:24:22+5:302017-12-12T15:44:29+5:30
मुंबईतील महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत विद्यार्थी संख्येत तब्बल ९० हजारांची घट झाली आहे.
मुंबई - मुंबईतील महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत विद्यार्थी संख्येत तब्बल ९० हजारांची घट झाली आहे. प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा अहवाल मंगळवारी प्रेस क्लबमध्ये जाहीर करण्यात आला. त्यात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार 2012-13 साली महापालिका शाळांत 4,34,523 विद्यार्थी शिकत होते.
मात्र त्यात घट होऊन 2016-17 या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांत केवळ 3, 43, 621 विद्यार्थी उरले आहेत. एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असताना मनपा शाळांसाठी होणाऱ्या आर्थिक तरतुदीत मात्र सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2008-09 साली मनपा शाळांसाठी असलेल्या 911 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल 2,454 कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सातवी इयत्तेत मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीबाबतही भयानक वास्तव समोर आले आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची तुलना खासगी शाळांसोबत केल्यास महापालिकेच्या एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळते, त्यावेळी खासगी शाळेतील 134 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते.