पालिकेचे विद्यार्थी दर्जेदार खिचडीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: January 24, 2016 01:14 AM2016-01-24T01:14:31+5:302016-01-24T01:14:31+5:30
शालेय पोषण आहाराच्या नावाखाली पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ खिचडी तेवढी मिळत आहे़ मात्र या खिचडीचा दर्जाही निकृष्ट असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार सुरू आहे़ त्यामुळे सेंट्रलाइज्ड
मुंबई : शालेय पोषण आहाराच्या नावाखाली पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ खिचडी तेवढी मिळत आहे़ मात्र या खिचडीचा दर्जाही निकृष्ट असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार सुरू आहे़ त्यामुळे सेंट्रलाइज्ड किचनची संकल्पना अमलात आणण्याचा आग्रह शिक्षण समितीमध्ये सदस्यांनी शुक्रवारी
धरला़ मात्र याबाबत राज्य सरकारकडे बोट दाखवून प्रशासनाने हात वर
केले़
२००७ साली सुगंधित दूध योजना पालिकेने आणली़ मात्र दूधबाधाच्या घटना वारंवार घडत असल्याने अखेर ही योजना दोन वर्षांपूर्वी गुंडाळण्यात आली़ दुधाऐवजी चिक्की देण्याचा प्रस्ताव अद्यापही अमलात आलेला नाही़ त्यामुळे मध्यान्ह भोजनात मिळणारी खिचडी हाच गरीब विद्यार्थ्यांसाठी आहार उरला आहे़ परंतु खिचडीमध्ये अळ्या सापडणे, बेचव असणे असे प्रकार सुरूच
असल्याने विद्यार्थी व पालक त्रासले आहेत़
गोवंडी येथील पालिका शाळेत नुकत्याच घडलेल्या विषबाधेच्या घटनेचे पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत शुक्रवारी उमटले़ भाजपाचे शिवनाथ दराडे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत खिचडी तयार करण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभारण्याची मागणी केली़ अशा सेंट्रलाइज्ड किचनमधून सर्व चाचणीनंतर शाळांना एकाच प्रकारची खिचडी पाठविण्यात आल्यास हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
प्रस्ताव शासन दरबारी
दर्जेदार खिचडी तयार करण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणेला परवानगी देण्याचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे़ शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास तत्काळ ही संकल्पना अमलात आणण्यात येईल, अशी हमी उपायुक्त रणजित ढाकणे यांनी शिक्षण समितीला दिली़