पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ‘दीक्षा’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:22 AM2018-12-29T06:22:17+5:302018-12-29T06:22:59+5:30
पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विधि शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांची नावे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ यादीत समाविष्ट नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई : पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विधि शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांची नावे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ यादीत समाविष्ट नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, त्यांना त्यांच्या गुणपत्रिका पुढच्या वर्षी मिळणार असल्याने मे २०१९ रोजी जाहीर होणाऱ्या पदव्यांचा यादीत त्यांची नावे समाविष्ट केली जातील, असे बेजबाबदार उत्तर विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे ११ जानेवारीला होणारा दीक्षान्त समारंभ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यापीठाकडून २५ डिसेंबरला दीक्षान्त समारंभाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांची नावे त्यात नसल्याने त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे धाव घेतली असता ‘केटी’ असल्याने यादीत त्यांची नावे नसल्याचे सांगण्यात आले. पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण होऊनही माहिती अपडेट न केल्याने विद्यार्थ्यांची नावे दीक्षान्त समारंभाच्या यादीत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल नियमानुसार जोपर्यंत विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्याकडे नसेल तोपर्यंत त्याला सनद मिळत नसल्याने उत्तीर्ण असूनही केवळ गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात फेºया माराव्या लागणार आहेत.
विद्यापीठात विसंवाद
विद्यापीठाच्या विविध विभागांत विसंवाद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही त्यात बदल झाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, हे गंभीर असल्याचे मत स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले.