विद्यार्थ्यांना आता मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय, राज्यात दोन टप्प्यांत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:37 AM2023-07-05T07:37:19+5:302023-07-05T07:37:26+5:30

‘अभियांत्रिकी’चा श्रेयांक आराखडा जाहीर ; स्वायत्त संस्थांमध्ये यंदापासून नियम लागू होणार

Students now have multiple entry-exit option, implemented in two phases in the state | विद्यार्थ्यांना आता मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय, राज्यात दोन टप्प्यांत अंमलबजावणी

विद्यार्थ्यांना आता मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय, राज्यात दोन टप्प्यांत अंमलबजावणी

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम आराखडा, श्रेयांक आराखडा याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या आराखड्याची अंमलबजावणी राज्यात दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात चालू शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये हा निर्णय़ लागू केला जाणार आहे. श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा पर्याय असणार आहे. 

राज्यातील २३१ संस्थांनी ही नवी रचना स्वीकारली असून, आता तेथील विद्यार्थ्यांना यंदापासून मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या स्वायत्त संस्थांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रम व श्रेयांक (क्रेडिटस्) आराखड्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी या धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून करण्यात येणार आहे.

कशासाठी, किती क्रेडिट्स?
चार वर्षांच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्षाच्या प्रमाणपत्रासाठी कमीत कमी ४० व जास्तीत जास्त ४४ श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत.दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ८० व ८८ आणि तीन वर्षांच्या बी. व्होक. किंवा बीएससी पदवीसाठी १२० व १३२ श्रेयांक मिळवावे लागणार आहेत. चार वर्षांच्या पदवीसाठी (मल्टीडिसिप्लिनरी मायनर) किमान १४० ते कमाल १७६ आणि ऑनर्स व मल्टीडिसिप्लिनरी मायनरसाठी १८० व १९४ श्रेयांक आवश्यक असतील. प्रत्येक सत्रासाठी किमान २० आणि कमाल २२ श्रेयांक आवश्यक असणार आहेत. 

मल्टिपल एंट्री - एक्झिट म्हणजे काय ? 

सध्याच्या रचनेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी असे शैक्षणिक टप्पे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना ठरावीक काळ प्रत्येक टप्प्यासाठी द्यावा लागतो. मात्र, आता एखाद्या पदवीचे शिक्षण घेताना कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडावा लागल्यास विद्यार्थ्यांनी घेतलेले शिक्षण वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना कौशल्यानुसार श्रेयांक (क्रेडिट्स) आणि अनुषंगाने प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यानुसार विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडण्याची किंवा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

४ वर्षे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात मुख्य विषयात कमीत कमी ५० टक्के क्रेडिट्स मिळविणे आवश्यक राहणार आहे. याशिवाय विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना मुख्य विषय आणि इतर छोटे अभ्यासक्रम यांची निवड करण्यासाठी अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या इंडियन नॉलेज सिस्टीम सेलचा उपयोग शैक्षणिक संस्था करून घेऊ शकणार आहेत.

Web Title: Students now have multiple entry-exit option, implemented in two phases in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.