Join us

फी न भरल्याने विद्यार्थी चार महिने वर्गाबाहेर! सांताक्रुझच्या सेंट मेरी हायस्कूलमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 6:29 AM

शाळेची चार महिन्यांची फी भरली नाही म्हणून दोन विद्यार्थ्यांना चार महिने वर्गाबाहेर बसविण्याचा प्रकार कलिनातील सेंट मेरी हायस्कूलमध्ये घडला.

मुंबई :

शाळेची चार महिन्यांची फी भरली नाही म्हणून दोन विद्यार्थ्यांना चार महिने वर्गाबाहेर बसविण्याचा प्रकार कलिनातील सेंट मेरी हायस्कूलमध्ये घडला. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर फादर तसेच मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शायना (नावात बदल) या सांताक्रुझ पूर्वेतील शास्त्रीनगर परिसरात राहत असून, त्यांचे पती वाहनचालक आहेत. जे टीबीच्या आजाराने ग्रस्त आहेत. परिणामी ते दररोज कामावर जात नसल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शायना यांना चार मुले असून, त्यातील एक जण नववीत, दुसरा आठवीत आणि तिसरा मुलगा दुसरीत सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिकतात. जी सरकारमान्य इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शायना यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आठवीत शिकत असलेल्या मुलाची फी २०२२-२३ मध्ये त्यांना भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे शाळेचे फादर रुई कमेलो आणि मुख्याध्यापक बारणाडेट्टे यांच्या सांगण्यावरून शिक्षकांनी त्यांच्या मुलाला चार महिन्यांपासून वर्गामध्ये न घेता बाहेर जमिनीवर बसवून ठेवले. त्याला बाहेर राहून जे काय शिकायचे ते शिक, असे सांगत सर्वांसमोर अपमानित केले. या सगळ्यामुळे तो रडत वर्गाबाहेरच बसून शिकत होता. मात्र, या सगळ्या भेदभावपूर्ण वागणुकीचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो आता शाळेत जाण्याचे नाकारत आहे. 

फी न भरल्यामुळे त्याला तुला परीक्षेला बसविणार नाही, असे बोलून टोमणे मारले जातात, असाही आरोप शायना यांनी केला आहे. शिक्षकांनी जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या चाचणी परीक्षेलाही त्याला बसू दिले नाही. तर हाच प्रकार प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रजिना परेरा या त्यांच्या दुसऱ्या मुलासोबतही करत होत्या, ज्याची थोडीफार फी बाकी आहे. 

मग बीएमसी शाळेत पाठवा...याबाबत शायना यांनी बारणाडेट्टे आणि परेरा यांच्याकडे विचारणा केल्यावर शाळेत शिकवायची क्षमता नसेल तर मुलांना महापालिकेच्या शाळेत पाठवा, असे सांगत फी भरत नाही तोपर्यंत वार्षिक परीक्षेलाही बसू दिले जाणार नाही, असे त्यांना थेट सांगितले गेले. अखेर या प्रकरणी शायना यांनी फादर, मुख्याध्यापक व प्रायमरी मुख्याध्यापक यांच्याविरोधात तक्रार दिली आणि वाकोला पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.