विद्यार्थी, पालकांनो ताण घेऊ नका
By admin | Published: June 13, 2017 02:48 AM2017-06-13T02:48:10+5:302017-06-13T02:48:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाच्या तारखा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. त्यामध्ये १२ जूनला दहावीचा निकाल असल्याची वावडी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाच्या तारखा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. त्यामध्ये १२ जूनला दहावीचा निकाल असल्याची वावडी उठल्याने सोमवार सकाळपासूनच अनेक विद्यार्थी आणि पालक तणावाखाली होते. पण, सोमवारी सायंकाळी अखेर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल १३ जूनला असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे ‘हार्ट बीट्स’ पुन्हा एकदा वाढले. पण, दहावीच्या निकालाचा ताण पालक आणि विद्यार्थ्यांनी घेऊ नये, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धांमध्ये दहावीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे इयत्ता नववीपासूनच अनेक घरांमधील वातावरणात बदल होतात. शिक्षक, पालक आणि क्लासवाल्यांमुळे दहावीची परीक्षा म्हणजे जगावेगळी परीक्षा असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने बिंबवले जात असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले.
डॉ. देव यांनी पुढे सांगितले, दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये झळकणारी नावे पुढे कुठेच दिसत नाहीत. त्यापेक्षा सरासरी गुण प्राप्त झालेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात नाव कमवताना दिसतात. कारण, दहावीच्या परीक्षेतील गुण हे महत्त्वाचे नाहीत. तर, मिळालेल्या गुणांपेक्षा ज्ञानार्जन किती झाले याला महत्त्व आहे. आणि या ज्ञानाचा सदुपयोग आयुष्यात किती करता येतो, याला महत्त्व दिले पाहिजे. ज्ञानार्जनावर भवितव्य अवलंबून असते हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीत मिळणाऱ्या गुणांमध्ये दोन ते चार टक्क्यांचा फरक पडतो. त्याचप्रमाणात दहावीत विद्यार्थ्यांना गुण मिळतात. पालकांनी वास्तव स्वीकारावे आणि विद्यार्थ्यांनाही स्वीकारण्याचे बळ द्यावे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, निकालाच्या बाबतीत वास्तविक अपेक्षा ठेवा. गुणांवरून स्वत:ला पारखू नका. दहावी आणि बारावीचे निकाल हे आयुष्यातील छोटे पण महत्त्वपूर्ण वळण आहे. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. स्वत:ची तुलना इतरांशी करू नका. मिळालेल्या गुणांवरून करिअर ठरवू नका. तर, करिअरच्या अनेक पर्यायांचा विचार करा. पालकांशी करिअरच्या बाबतीत स्पष्ट आणि गंभीरपणे बोला.
पालकांसाठी टिप्स
- तुमचा पाल्यावर विश्वास ठेवा. निकालामुळे विश्वास कमी होऊ देऊ नका.
- इतर मुलांशी तुमच्या पाल्याची तुलना करू नका.
- चांगले गुण मिळवण्यासाठी पाल्याने त्याच्या परीने केलेच्या मेहनतीचे कौतुक करा.
- पाल्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करा आणि पुढे जाण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या. पाल्याशी स्पष्ट पण मोकळा संवाद कायम ठेवा.
- तुमचे निर्णय पाल्यावर लादू
नका. त्याला जो करिअरचा
पर्याय निवडायचा आहे,
त्याला पाठिंबा द्या.