मुंबई- नीट-युजीच्या सदोष निकालाची सीबीआयकडून चौकशी व्हावी याकरिता राज्यातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. विद्यार्थी पालकांचे म्हणणे संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी पालकांना दिले.
नीट युजीचा सीबीआयकड़ून तपास करण्यात यावा, आणि त्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, अशा मागण्या पालकांनी यावेळी केल्या. आपल्या मागण्याचे लेखी निवेदन पवार यांच्याकडे देण्यात आले. संसदेत हा प्रश्न उचलून धरू तसेच, केंद्रीय शिक्षण विभागाकडेही पाठपुरावा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले. येत्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांना भेटून आपले म्हणणे मांडणार असल्याचे पालकांनी सांगितले.