Join us

विद्यार्थ्यांची फार्मसीलाच पसंती, अभियांत्रिकीच्या जागा पुन्हा माेठ्या प्रमाणात रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात अजूनही अभियांत्रिकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात अजूनही अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे रिक्त जागांवरून दिसत आहे. यंदा अभियांत्रिकीच्या राज्यात तब्बल ५५ हजार ४४४ जागा रिक्त राहिल्या आहेत तर फार्मसीच्या केवळ १,७२९ जागांवर प्रवेश झाले नसल्याची माहिती आहे. या रिक्त जागांच्या संख्येवरून विद्यार्थ्यांचा फार्मसीकडे असलेला कल स्पष्ट दिसून येत आहे.

राज्यातील पदवी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या शासकीय संस्थांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. मात्र, विनाअनुदानित संस्थांमध्ये निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या राहात असून, वर्ग ओस पडले आहेत. राज्यभरातील ३३१ संस्थांमध्ये यावर्षी १ लाख २३ हजार ८९५ जागा होत्या. त्यापैकी ६८ हजार ४५१ जागांवर प्रवेश झाले आहेत. तब्बल ५५ हजार ४४४ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. जागा रिक्‍त राहण्याचे प्रमाण ४४.७५ टक्के इतके आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे, गतवर्षी हे प्रमाण ४८ टक्के होते. यंदा मुळातच अभियांत्रिकीच्या जागा घटल्याने ही रिक्त जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

फार्मसी अभ्यासक्रमाचा विचार केल्यास राज्यात फार्मसीच्या ३२१ संस्थांमध्ये २५ हजार ३२७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २३ हजार ६४१ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार ७२९ जागा म्हणजे फक्त ६.८२ टक्के जागा रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) आणि संबंधित क्षेत्रातील रोजगाराला आणि पर्यायाने अभ्यासक्रमाला मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील आणखी काही वर्ष फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम राहणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. फार्मसीच्या शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमधील जागा फुल्ल झाल्या असून, ज्या ६ टक्के जागांवर प्रवेश बाकी असल्याचे दिसून आले आहे, त्या जागा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांतील आहेत.

राज्यभरात ३१० संस्था विनाअनुदानित आहेत. या संस्थांमध्ये तब्बल १ लाख १७ हजार २३४ जागा आहेत. त्यापैकी केवळ मागणी असलेला अभ्यासक्रम धरुन ६२ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर या संस्थांत ५४ हजार ६६७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. शासकीय ९ संस्थांमधील ३ हजार २७० जागांपैकी २ हजार ९७९ जागांवर प्रवेश झाले आहेत तर २९१ जागा रिक्त राहिल्या आहेत.

* अभियांत्रिकी पदव्युत्तरच्या ५५.२१, तर फार्मसी पदव्युत्तरच्या २० टक्के जागा रिक्‍त

एम. ई. (अभियांत्रिकी पदव्युत्तर)च्या असलेल्या १९६ संस्थांत १२ हजार ४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी ५ हजार ५७९ जागांवर प्रवेश झाले आहेत तर ६ हजार ८७७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. रिक्‍त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१ टक्के इतकी आहे. पदवीप्रमाणे अभियांत्रिकी पदव्युत्तरची मागणीही विद्यार्थ्यांकडून कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे फार्मसी पदव्युत्तरच्या २० टक्के जागा राज्यात रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील ११३ संस्थांमध्ये फार्मसीच्या ३,२०० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी २,५५८ जागा भरल्या असून, ६४२ जागा रिक्त राहिल्या आहेत.

.... ....