Join us

शाळेचे पत्रे उडाल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Published: April 06, 2015 10:42 PM

कर्जत तालुक्यातील चई गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर एकाच खोलीत दाटीवाटीत बसण्याची वेळ आली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील चई गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर एकाच खोलीत दाटीवाटीत बसण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी वादळामुळे चई गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाले होते. यावेळी महसूल विभागाने पंचनामा केला होता. मात्र कर्जत पंचायत समितीने कोणतीही उपाययोजना केली नाही. सध्या परीक्षेचा कालावधी असून तापमानही वाढले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. चईतील रायगड जिल्हा परिषदेची शाळा सातवीपर्यंत आहे. तेथे चार वर्गखोल्या जिल्हा परिषदेने बांधल्या आहेत. त्यापैकी दोन वर्गखोल्यांचे वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. एका खोलीची सर्व पत्रे उडून गेली असून दुसऱ्या एका खोलीचे काही पत्रे फुटले आहेत. तर एका वर्गखोलीच्या छपराचे झापे उडून गेले आहेत, त्यामुळे सूर्यप्रकाश थेट वर्गखोलीत येत आहे. तसेच खिडक्याही तुटल्याने शाळा पूर्णपणे असुरक्षित झाली आहे. परिणामी त्या शाळेतील दीडशे विद्यार्थी यांना एकाच वर्गखोलीत दाटीवाटीत बसावे लागत आहे . सध्याच्या परीक्षा असलेल्या हंगामात तारेवरची कसरत तेथील शिक्षक वर्गाला करावी लागत आहे. बाहेर प्रचंड उष्मा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातही बसवू शकत नाही. अशी स्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न न सुटण्यासारखा झाला आहे. कारण कर्जत पंचायत समिती त्याबाबत सकारात्मक दिसत नाही . याबाबत वादळी वाऱ्याने शाळेचे नुकसान झाल्यानंतर त्या भागातील महसूल कर्मचाऱ्यांनी तत्काळ चई गावात जावून शाळेच्या इमारतीची पाहणी केली. तसेच आपला अहवाल कर्जत तहसील कार्यालयास सादर केला आहे . त्याचवेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा पांडुरंग कारोटे यांनी सर्व माहिती केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून कर्जत पंचायत समिती आणि शिक्षण विभागाला कळविली आहे. कर्जत पंचायत समितीकडून चई शाळेच्या दुरु स्तीबाबत सर्व शिक्षा अभियान यांना कळविले आहे. महसूल खात्याने शाळेच्या नुकसानीबाबत साठ हजार नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आर्थिक तरतूद करून चई शाळेचे नुकसान भरून काढणार का, की पावसाळ्यात अशीच इमारत राहणार, आदी प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहेत. (वार्ताहर)