मुंबई : डॉक्टर-अभियंता बनून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू असताना महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र शेती, सैन्य आणि पोलीस दल असे आव्हानात्मक व कष्टाचे क्षेत्रात निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण व कल लक्षात घेत, त्यांना त्यांच्या करिअरची दिशा ठरविता यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन व समुपदेशन सत्रादरम्यान मुलांची ही देशभावना समोर आली.एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या मोफत स्वरूपाच्या उपक्रमाचा गेल्या वर्षी नववीत असणाऱ्या साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. याच उपक्रमादरम्यान यंदा मुलांचा करिअरचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये पालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणाºया ९.४६ टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस असून, त्यांना शेतीतज्ज्ञ व्हायचे आहे. तर ७.३० टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जाण्याची आणि ७.२५ टक्के विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असल्याचे दिसून आले.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे? या अनुषंगाने त्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित समुपदेशन व सुयोग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने गेल्या वर्षीपासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी हे सत्र ६ आॅगस्ट रोजी असून नववीचे वर्ग असणाºया २१० शाळांमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून राबविले जाणार आहे. यासाठीचा सर्व खर्च संबंधित स्वयंसेवी संस्थेद्वारेच केला जात असल्याने हा उपक्रम पालिका शाळांसाठी मोफत स्वरूपात राबविला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.असे होतेकरिअर मार्गदर्शनया उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सोमवार ते शुक्रवार, असे सलग पाच दिवस दररोज तीन तास तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी गटनिहाय संवाद साधतात.प्रत्येक गटात सुमारे ४० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यापैकी पहिल्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण व त्यांचा कल शास्त्रीय पद्धतीने अभ्यासला जातो.यादरम्यान संबंधित विद्यार्थ्याचा जो कल लक्षात येईल, त्यानुसार अनुरूप असणाºया अभ्यासक्रमांच्या माहितीसह नोकरी व व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यास दिली जाते.पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधला जातो.समुपदेशन सत्रउपक्रमाच्या दुसºया टप्प्यांतर्गत एक विशेष समुपदेशन सत्र घेतले जाते. या सत्रादरम्यान सर्व विद्यार्थ्यांशी, त्यांच्या शिक्षकांशी आणि पालकांशीही चर्चा केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा अहवाल स्वतंत्रपणे देण्यात येतो.उपक्रमाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा हा संबंधित विद्यार्थी दहावीत गेल्यानंतर घेतला जातो. या अंतर्गत दहावीच्या पहिल्या सहा महिन्यांत एक उजळणी सत्र व दहावीच्या अंतिम परीक्षेपूर्वी दुसरे उजळणी सत्र घेतले जाते. या उजळणी सत्रांदरम्यान आदल्या वर्षीचे निष्कर्ष पुन्हा एकदा तपासून पाहिले जातात. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक कलाबाबत काही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेऊन त्या आधारे विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा समुपदेशन केले जाते.या तिसºया सत्रातील संवादादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात दहावीच्या परीक्षेबद्दल भीती असेल किंवा करिअरविषयक स्पर्धेबाबत नकारात्मकता असल्यास त्याबाबतदेखील समुपदेशन केले जाते. यानंतर संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या कल चाचणीच्या अनुषंगाने अंतिम अहवालाची प्रत दिली जाते.
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा देशसेवेकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:34 AM