मुंबई : मुंबईविद्यापीठाच्यापरीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थीना मनस्ताप सहन करावा लागला. तासभर थांबूनही अखेर विद्यार्थ्यांना बारकोड न देताच पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला.
२२ फेब्रुवारीपासून एमएच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरू झाली. परंतु, पहिल्याच पेपरच्या दिवशी बारकोड न आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला. पेपर उशिरा सुरू झाला. त्यानंतर याच विषयाचा 'फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया' हा पेपर असताना विद्यार्थ्यांना 'इंडिया नेबरहूड पॉलिसी'ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही बाब कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, विद्यापीठाकडून हीच प्रश्नपत्रिका आली आहे, असे सांगून ती सोडविण्यास सांगण्यात आले. काही परीक्षा केंद्रांवर नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परंतु, काही केंद्रांनी तीच प्रश्नपत्रिका सोडवा म्हणून सांगितले, अशी तक्रार मनसेच्या नेत्यांनी केली.
समस्यांवर तोडगा काढा :
परीक्षा विभागाचा हा भोंगळ कारभार सुधारण्यात यावा, अशी मागणी सुधाकर तांबोळी यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पूजा रोंदळे यांची भेट घेत केली. संचालकांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुधाकर तांबोळी यांनी केली. या परीक्षेत आमचे निश्चितपणे नुकसान होणार आहे. जो विषय आम्ही निवडलाच नव्हता, ज्याचा कधी अभ्यासच केला नव्हता, त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने केला.