पाऊले चालती ऑफलाइन, इंटिग्रेटेडची वाट, खासगी शिकवण्या सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:29 AM2019-06-29T02:29:33+5:302019-06-29T02:33:38+5:30
अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेशाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवत कोट्यांतर्गत आॅफलाइन प्रवेश तसेच इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे.
- सीमा महांगडे
मुंबई - अकरावी प्रवेश वेळापत्रकाला यंदा लागलेला लेटमार्क, अजूनही जाहीर न झालेल्या शाखानिहाय एकूण जागा या सर्व गोंधळात अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेशाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवत कोट्यांतर्गत आॅफलाइन प्रवेश तसेच इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे.
इंटिग्रेटेड महाविद्यालय बंद करणार अशी घोषणा शालेय शिक्षण विभागाकडून अनेकदा करण्यात आली, मात्र मुंबई विभागातील दुय्यम दर्जाची महाविद्यालये आणि नामांकित कोचिंग क्लासेसचे ‘टायअप’ सुरूच आहे. विशेष म्हणजे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होणारा गोंधळ, प्रवेशप्रक्रियेस होणारा उशीर आणि त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास विलंब यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. हा अनुभव गाठीशी असल्याने यंदा अनेक विद्यार्थ्यांनी कोट्याअंतर्गत आॅफलाइन आणि इंटिग्रेटेड प्रवेश घेऊन ठेवले आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचा खासगी शिकवणी वर्गातील अभ्यासही सुरू झाला आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेऊ नये असे आवाहन उपसंचालक कार्यालयांकडून विद्यार्थ्यांना करण्यात येते. मात्र अकरावी आॅनलाइन प्रवेशात इंटिग्रेटेड महाविद्यालयांचा समावेश करू नका, अशा कोणत्याही सूचना यंदा शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मिळालेल्या नसल्याचे समजते.
...तोपर्यंत कारवाई करणे अशक्य
यासंदर्भात मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर थेट कारवाई करावी असे कोणतेही आदेश शिक्षण विभागाकडून आमच्यापर्यंत आलेले नाहीत. ही महाविद्यालये इंटिग्रेटेड तत्त्वावर चालतात किंवा विद्यार्थी महाविद्यालयांत जातच नाहीत याची सिद्धता होत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
धोरण आखून कारवाई करावी
अशा प्रकारच्या प्रवेशांमुळे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत येणार आहेत. संचमान्यतेला स्थगिती हा यंदाच्या वर्षापुरताच उपाय आहे, कायमचा नाही. अशा प्रवेशांमुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश क्षमतेवर परिणाम होऊन शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती असते. आॅफलाइन प्रवेश, इंटिग्रेटेड प्रवेश याकडे शिक्षण विभाग डोळेझाक करत आहे. त्याऐवजी शिक्षण विभागाने यासाठी धोरण आखून कारवाई करणे आवश्यक आहे.
- एल. एस. दीक्षित, उपाध्यक्ष, मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना
इंटिग्रेटेड महाविद्यालये म्हणजे काय?
काही क्लासेस शिक्षण विभागाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी घेतात. महाविद्यालयांच्या नावावर मग क्लासेसच चालवितात. परवानगी देताना नियमांचे पालन झाले की नाही हे पाहिले जात नाही. अनेक ठिकाणी क्लासेस आणि महाविद्यालयांत अकरावी, बारावीसाठी टायअप असते. क्लासला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना अमुक एका महाविद्यालयातच प्रवेश घेण्यास सांगितले जाते आणि हे महाविद्यालय दुय्यम दर्जाचे असते.