विद्यार्थ्यांनी आभासी दुनियेतून बाहेर पडावे
By admin | Published: June 29, 2017 03:07 AM2017-06-29T03:07:53+5:302017-06-29T03:07:53+5:30
आजचे विद्यार्थी हे अंमली पदार्थांबरोबर तंत्रज्ञानाच्याही आहारी गेले आहेत. या आभासी दुनियेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वास्तविक जीवनात वावरावे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजचे विद्यार्थी हे अंमली पदार्थांबरोबर तंत्रज्ञानाच्याही आहारी गेले आहेत. या आभासी दुनियेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वास्तविक जीवनात वावरावे, असे प्रतिपादन संकल्प या सामाजिक संस्थेचे संस्थापक इल्डरेड टेलिस यांनी केले. तरूणांमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेबाबत परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई एन.सी.सी, सोशल सर्विस लीग आणि आर. एम. भट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इल्डरेड टेलिस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, योग केल्यामुळे जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्राप्त होवून व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होते. अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांना गुन्हेगार न समजता त्यांना सरळ व साधे आयुष्य जगण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अहमद शेख या तरुणाने आपल्या शालेय जीवनामध्ये संगत व आजूबाजूच्या परिसरमुळे अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे आपल्यावर आलेले प्रसंग कथन केले. दरम्यान विध्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणारे पोस्टर बनविण्याची स्पर्धा रंगली. एन.सी.सी कॅडेड व शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.