Join us

विद्यार्थ्यांनो घरी बसून करा लर्निंग फ्रॉम होम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:26 PM

घरबसल्या मिळणार विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिक्षा

मुंबई : संचारबंदीच्या काळात शालेय शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षणासाठी विविध संकेतस्थळे  आणि पर्याय उपलब्ध करून दिले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण पूर्ण करता येणे शक्‍य होणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिकधिक वापर करून विदयार्थी पालक व शिक्षकांनी घरातूनच ई लर्निंग सुरु ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शालेय स्तरावरील आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आता उपयुक्‍त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना आता स्वयंअध्ययन करता येईल. सद्य:स्थितीत शालेय अभ्यासक्रमातील मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल, कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासाची आता नवीन दिशा ठरविता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकेल. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून “लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे सर्व पालकांपर्यंत आणि मुलांपर्यंत पोहोचून आपले शिक्षण आपण या काळात सुद्धा चालू ठेवू शकतो. त्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक एप्लिकेशन्स यांचा वापर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सेक्‍युरिटी संदर्भातही विद्यार्थी आणि पालक यांचे सतत उद्‌बोधन होणे आवश्‍यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.बालभारतीकडूनही इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित पाठयपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. या काळातही बालभारतीकडून विद्यार्थ्यंसाठी ऑनलाईन पाठयपुस्तके, ऑनलाइनसाठी ई लर्निंगची संकेतस्थळे,  व्हिडीओ स्वरूपातील साहित्य, किशोर मासिक अशा साधनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. याचसोबत विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठीही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या रूपात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषांमधील ९, ८०, ००० पुस्तके ई-बुक स्वरुपात या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. तर गुगलद्वारा निर्मित बोलो हे ऍप्लिकेशन मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्‍त आहे याचाही विद्यार्थ्यांनी वापर करावा असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

----------------------------------------सरकारकडून विद्यार्थ्यांनी पुढील संसाधनांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

दिक्षा : प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने “दिक्षा’ हे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. “दिक्षा’वर सद्य:स्थितीमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील 900 पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. यावर उपलब्ध ई-साहित्यामध्ये प्रामुख्याने इंटरॅक्‍टिव्ह व्हिडिओ, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ, उपक्रमावर आधारित व्हिडिओ. बौद्धिक खेळ स्वरुपातील गेम्स, विविध यर्कशिट, इंटरॅक्‍टिव प्रश्‍ने इत्यादींचा समावेश आहे. तसेच, दिक्षा मोबाइल ऍपवर इयत्ता पहिली ते दहावीच्या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये क्‍यू.आर. कोड देण्यात आले आहेत.इयता पहिली ते दहावी साठीचे “दिक्षा’ वेब पोर्टल : संगणक व लॅपटॉपवरदेखील दिक्षामधील ई-साहित्य पाहण्यासाठी हे वेब पोर्टल विकसित केले आहे. यात पहिली ते दहावीच्या सर्व विषयांचे ई-साहित्य पाहता येते.क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्‍न : इयता आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, गणित आणि विज्ञान साक्षरतेवरील सीसीटी आठवड्यातून “दिक्षा’वर अपलोड केल्या जातात. सीसीटी सरावासाठी नवीन प्रश्‍न दर सोमवारी अपलोड केले जातात आणि गुरुवारी उतरे दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार कौशल्य निर्माण करण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे.

 

टॅग्स :शिक्षण क्षेत्रकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या