Join us

मालवणीत विद्यार्थ्याच्या खेळाचे साहित्य जाळले! काळ्या फिती बांधून करणार निषेध

By गौरी टेंबकर | Published: December 20, 2023 7:06 PM

नशाखोरी विरोधात अभियान छेडल्याने हा त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप आहे.

मुंबई: मालवणीतील वंदे मातरम शिक्षण संस्थेवर पुन्हा मंगळवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. या ठिकाणी ठेवलेल्या खेळाचे साहित्य जाळण्यात आले आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करत असून घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी काळ्या फिती बांधून मैदानात खेळणार असल्याचे शिक्षकांकडून बुधवारी सांगण्यात आले.

सदर संस्थेचे सचिव फिरोज शेख यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर २०२३ रोजीच्या रात्री पुन्हा काही असामाजिक कंटकांनी लहान मुलांच्या खेळाचे साहित्य निर्दयीपणे जाळले. हा प्रकार पहिला नसून २८ जानेवारी,२०२३ मध्ये देखील अशाच प्रकारे खेळाचे साहित्य जाळत त्याचे नुकसान करण्यात आले होते. तर मार्च मध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ला पोलीस पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. नशाखोरी विरोधात अभियान छेडल्याने हा त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप आहे.

दरम्यान या घटनेची सर्वच स्तरावरून निंदा होत असून आहे. तर या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी २१ आणि २२ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून मैदानात खेळण्याचे ठरवले आहे. ज्याला स्थानिक नागरिक व पालकांनीही पाठिंबा दिला आहे. मालवणी पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. तसेच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :आगमुंबई