Join us

पर्यवेक्षिकेच्या अरेरावीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष धोक्यात, बोरीवली येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:34 AM

बोरीवली पश्चिमेकडील सेंट फ्रांसिस शाळेतील पर्यवेक्षिकेच्या अरेरावीमुळे ७०० मुलांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- मनोहर कुंभेजकर ।मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील सेंट फ्रांसिस शाळेतील पर्यवेक्षिकेच्या अरेरावीमुळे ७०० मुलांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या चित्रकलेच्या इंटरमिजियेट परीक्षेच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा गुंडाळण्यात आल्याचा आरोप, अनेक विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.चित्रकलेच्या इंटरमिजियेट परीक्षा सुरू असून, बोरीवली येथील सेंट फ्रांसिस ही इंग्रजी माध्यमाची महाराष्ट्र बोर्डाची शाळा यंदा परीक्षा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी दररोज दोन, याप्रमाणे मुलांना चार पेपर सोडवायचे होते. सकाळी १०. ३० ते १. ३०, तसेच दुपारी २.३० ते ४.३० दुसरा पेपर होणार होता. मात्र, २३ तारखेला पेपरच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच पेपर वाटण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी सुमारे ८० टक्के विद्यार्थी यायचे बाकी होते, तसेच ४.३० ही पेपर संपण्याची वेळ असताना, ३.३० लाच विद्यार्थ्यांकडून पेपर काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवटच राहिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता, अनेक विद्यार्थी व पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.सेंट फ्रांसिस शाळेच्या या परीक्षा केंद्रावर निरनिराळ्या शाळांची ६०० ते ७०० मुले परीक्षेसाठी आली होती. तेथील मुख्य पर्यवेक्षिका महिला असून, त्यांनी सकाळच्या पेपरपासूनच पालकांवर ओरडण्यास सुरुवात केली होती. पहिला पेपर संपल्यावर मधल्या वेळेत पालकांनी पाल्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. या वेळी मुख्य पर्यवेक्षिकेने पूर्वसूचना न देता, अर्धा तास आधीच प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. न्याहारीसाठी गेलेले विद्यार्थी परत आले असता, पेपरचे वाटप झाल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी पर्यवेक्षिकेने विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका देऊन, ‘साडेतीन वाजता मी पेपर घेणार आहे,’ असे सांगितले. याबाबत काही पालकांनी ईमेलद्वारे मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असून, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :विद्यार्थी