नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Published: May 29, 2017 03:56 AM2017-05-29T03:56:03+5:302017-05-29T03:56:03+5:30
बारावीच्या सीबीएससीच्या निकालात नापास झाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे. त्याने परीक्षेच्या
नवी मुंबई : बारावीच्या सीबीएससीच्या निकालात नापास झाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे. त्याने परीक्षेच्या निकालात कुटुंबाला नाराज केल्याची खंत आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. निकालानंतर मित्र त्याच्या भेटीला गेले असता घराचा दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडला असता ही घटना उघड झाली.
पृथ्वी सचिन वाव्हळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभिनेत्री क्रांती रेडकर हिचा भाचा असून घटनेची माहिती मिळताच त्यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. पृथ्वी हा सानपाडा सेक्टर १३ येथील शंकर टॉवरमध्ये सहकुटुंब रहायला होता. रविवारी बारावीचा सीबीएससीचा निकाल त्याने तपासला. या वेळी त्याला आपण दोन विषयात नापास झाल्याचे समजले. या नैराश्यात त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तर आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करू शकलो नसल्याची खंत व्यक्त केली आहे. घरातील सर्वच व्यक्ती गावी गेले आहेत. मात्र निकालानंतर त्याचे काही मित्र त्याच्या घरी आले. परंतु दरवाजा वाजवूनही तो उघडला न गेल्यामुळे त्याच्या मित्रांनी शेजाऱ्यांना सांगितले. त्यापैकी काहींनी सानपाडा पोलिसांना कळवून घराचा दरवाजा तोडला. या वेळी घरामध्ये पृथ्वीचा मृतदेह आढळला. (प्रतिनिधी)