‘मिट्टी के सितारे’मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:18 AM2019-01-25T02:18:43+5:302019-01-25T02:18:48+5:30
इंग्रजी आणि दर्जेदार शाळांतील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा तिथे आयोजित होणाऱ्या अनेक उपक्रमांमधून समोर येते़
मुंबई : इंग्रजी आणि दर्जेदार शाळांतील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा तिथे आयोजित होणाऱ्या अनेक उपक्रमांमधून समोर येते़ मात्र पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला भरारी घेण्यासाठी फारसा वाव मिळत नाही. हेच आव्हान स्वीकारून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिट्टी के सितारे’ या नव्या टॅलेंट हंटची अधिकृत घोषणा अमृता फडणवीस यांनी केली. मुंबई पालिकेतील १,१८७ पालिका शाळांसाठी हा उपक्रम खुला असून विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन आपली प्रतिभा सादर करू शकणार आहेत. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना संगीत उद्योगातील प्रख्यात कलाकारांसह स्टेजवर काम करण्याची संधी मिळणार आहे. अमृता फडणवीस यांचे दिव्याज् फाउंडेशन, एमपॉवर, शंकर महादेवन अकादमी यांच्या सहकार्याने ‘मिट्टी के सितारे’ या मिशनची संकल्पना मांडण्यात आली आहे.
प्रथमच महापालिकेच्या मुलांसाठी अशा मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आयोजित केला जात आहे. हाय-एंड स्कूलमध्ये शिकणाºया मुलांना संगीत प्रशिक्षण देणे सहजशक्य आहे, परंतु ‘मिट्टी की सितारे’द्वारा पालिका शाळांतील लपून राहिलेली रत्ने समोर येण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली.
‘मिट्टी के सितारे’साठी आॅडिशन्स फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पालिका शाळांतील ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ती असणार आहेत. आपल्या गायन व वाद्य संगीताच्या व्हिडीओ आणि आॅडिओ क्लिप्स त्यांनी संकेतस्थळावर अपलोड करायच्या आहेत.
शोमध्ये ४ आॅडिशन्सचे राउंड असणार असून, यातून उत्कृष्ट व प्रतिभाशाली मुलांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी शाळा आॅडिशनच्या पहिल्या फेरीत स्पर्धा करण्यासाठी ५ विद्यार्थ्यांची निवड करतील. पुढच्या फेरीमध्ये २०-३० विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.
मिट्टी के सितारे आॅडिशन्स फेब्रुवारीपासून सुरू होणार असून विस्तृत प्रशिक्षण मेपर्यंत सुरू राहील, त्यानंतर याचा प्रस्तावित ग्रँड फिनाले आयोजित केला जाणार आहे. मुंबईपासून या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असली तरी तो फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता नवी मुंबई, ठाणे आणि बºयाच शहरांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
>ज्या विद्यार्थ्यांकडे प्रतिभा आहे, कौशल्य आहे पण ते ओळखले जात नाही अशा मुलांसाठी ही एक असामान्य संधी आहे. मिट्टी के सितारे हा पालिका शाळांतील आणि वंचित क्षेत्रातील मुलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारा भारतातील पहिला शो असेल ज्याच्या मदतीने आपल्या देशातील प्रतिभा बहरून येईल. - शंकर महादेवन