विद्यार्थ्यांचा कल ‘सेल्फ फायनान्स’कडे, मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:42 AM2023-06-18T07:42:16+5:302023-06-18T07:42:36+5:30
गेल्या वर्षाप्रमाणेच हा कल असून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही याच प्रकारच्या अभ्यासक्रमाला पसंती दर्शवीत आहेत.
मुंबई : बारावी परीक्षेनंतर महाविद्यालयांच्या प्रथम वर्षासाठी (एफवाय) प्रवेशांची झटापट सुरू झाली असून पारंपरिक कला, विज्ञान यासारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांप्रमाणे व्यवसायाभिमुख (सेल्फ फायनान्स) अशा बीबीआय, बीएएफ, बीएफएम अभ्यासक्रमांकडे ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा कल राहण्याची शक्यता दिसून येत आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच हा कल असून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही याच प्रकारच्या अभ्यासक्रमाला पसंती दर्शवीत आहेत.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात २ लाख ३३ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी पदवी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ६ लाख ५४ हजार ८२८ अर्ज विविध महाविद्यालयात केले आहेत. या प्रक्रियेत बीबीआय, बीएएफ, बीएफएम यांसारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांमुळे व्यावसायभिमुख प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडे हा ओढा वाढत आहे. मुंबई विभागात ३ लाख २९ हजार ३३७ विद्यार्थी बारावीला बसले होते. त्यापैकी २ लाख ९० हजार २५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील उद्योगधंद्यांना पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याने मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून ‘सेल्फ फायनान्स’ अभ्यासक्रमांना सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने यंदा ही संख्या वाढली आहे. यातच वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा ओढा ‘सेल्फ फायनान्स’कडे वळल्यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी अधिक अशी स्थिती आहे. मुंबई विद्यापीठाने सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम सुरू केले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमांकडे वाढता ओढा लक्षात घेता ते उद्दिष्ट साध्य झाले असे वाटते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा कट ऑफही एक ते दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.