ग्रीन स्ट्राइक! नॅशनल पार्कमध्ये फेकले गेले 10 हजार सीडबॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:14 AM2019-07-01T03:14:10+5:302019-07-01T08:00:46+5:30

मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, जवळपास ३० प्रजातींच्या झाडांची एक यादी वनविभागाकडून घेण्यात आली.

 Students throw 'Seed Bomb' in Sanjay Gandhi National Park | ग्रीन स्ट्राइक! नॅशनल पार्कमध्ये फेकले गेले 10 हजार सीडबॉम्ब

ग्रीन स्ट्राइक! नॅशनल पार्कमध्ये फेकले गेले 10 हजार सीडबॉम्ब

Next

मुंबई : मान्सूनला सुरुवात झाल्यावर वनविभाग, पर्यावरण संस्था व संघटना, शाळा-महाविद्यालयांकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. मिशन ग्रीन मुंबई या संस्थेच्या वतीने दहा हजारांहून अधिक ३० प्रजातींच्या झाडांचे सीडबॉम्ब तयार करण्यात आले आहेत. तसेच एक कोटी सीडबॉम्ब तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. या वेळी संस्थेने काही सीडबॉम्ब हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेकले. सायन कोळीवाडा येथील गुरूनानक कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात ‘सीडबॉम्ब’ बनविण्याची नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी एक हजार सीडबॉम्ब तयार केले.

मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, जवळपास ३० प्रजातींच्या झाडांची एक यादी वनविभागाकडून घेण्यात आली. ‘गोरीला प्लॅन्टेशन’ ही एक झाडे लावण्याची पद्धत आहे. घनदाट जंगलामध्ये जाणे शक्य नसते. तसेच खासगी जमिनीमध्ये प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी गोरीला प्लॅन्टेशन पद्धत वापरली जाते. त्यासाठी सीडबॉम्बस् तयार केले जातात. ते जमिनीवर पडले की त्यातून नव्या झाडांची निर्मिती होते. आतापर्यंत १० हजारांहून अधिक सीडबॉम्ब तयार करण्यात आले आहेत. सायन कोळीवाडा येथील गुरूनानक कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात ‘सीडबॉम्ब’ बनविण्याचे एकदिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेऊन एक हजार सीडबॉम्ब तयार केले.



या वर्षी गुरूनानक देव यांच्या जयंती वर्षानिमित्त पाचशे पन्नास सीडबॉम्ब तयार करण्याचे ध्येय होते. परंतु विद्यार्थ्यांनी एक हजार सीडबॉम्ब तयार केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पींदर भाटिया म्हणाल्या की, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरण सल्लागार रश्मी जोशी यांच्यासोबत पर्यावरण संबंधित कार्यक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केला. या वेळी पर्यावरण मार्गदर्शन समितीच्या समन्वयक डॉ. मिताली दासगुप्ता यांची उपस्थिती होती.



असे तयार केले जातात ‘सीडबॉम्ब’
मातीमध्ये खताचे आणि झाडांच्या बियांचे मिश्रण करून सीडबॉम्ब तयार केले जातात. सीडबॉम्ब सुकण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. सीडबॉम्ब सुकल्यावर ते स्वयंसेवकांच्या माध्यमातून जंगलातील मोकळ्या जागेत टाकले जातात. सध्या सीडबॉम्ब संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेकले असून काही दिवसांत त्या ठिकाणी नवे रोपटे जन्माला येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

Web Title:  Students throw 'Seed Bomb' in Sanjay Gandhi National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई