पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क कपातीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:39+5:302021-06-29T04:06:39+5:30

उदय सामंत; निर्णय आज हाेणार जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील शासकीय व अनुदानित विद्यार्थ्यांना शुल्ककपातीचा दिलासा ...

Students of traditional courses will also get relief from fee reduction | पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क कपातीचा दिलासा

पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क कपातीचा दिलासा

googlenewsNext

उदय सामंत; निर्णय आज हाेणार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील शासकीय व अनुदानित विद्यार्थ्यांना शुल्ककपातीचा दिलासा दिल्यानंतर आता पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनाही तो मिळणार आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत सोमवारी यासंदर्भात बैठक घेतली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाशी संलग्न अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयाच्या शुल्कात सवलत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र सवलत किती मिळणार याची माहिती सविस्तर आढावा घेऊन मंगळवारी (२९ जून) जाहीर करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून दिली.

कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण यासह इतर शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात आहे. कोरोनामुळे शुल्क कमी करावे, अशी मागणी गेल्या वर्षापासून विद्यार्थी व पालक सातत्याने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील शुल्कात २५ टक्के कपात केली आहे. नागपूर विद्यापीठाने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण आदी इतर शुल्क कमी केले आहे. याच धर्तीवर सर्वच विद्यापीठांचे शुल्क कमी करावे, अशी मागणी होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विद्यापीठांनी शुल्क कपात करावी यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, सोमवारी सर्व कुलगुरूंसोबत बैठक झाली असून त्यांच्याशी चर्चा करून शुल्क कपातीबाबत सकारात्मक निर्णय झाला.

* पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ

कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याबाबतही विचार झाला आहे. या निर्णयामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णयही मंगळवारी जाहीर हाेईल.

Web Title: Students of traditional courses will also get relief from fee reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.