मुंबई : मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ संपता संपत नसल्याने आता विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तब्बल तीन महिने उशिरा निकाल जाहीर करूनही हजारो विद्यार्थी आजही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई विद्यापीठ आश्वासनांवर विद्यार्थ्यांची बोळवण करत असल्याने आता विद्यार्थ्यांचा पारा चढला आहे. मंगळवार, २४ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता विद्यार्थी परीक्षा भवनावर धडकणार आहेत.मुंबई विद्यापीठाचे उशिरात उशिरा निकाल हे जून महिन्यापर्यंत लागले आहेत. पण, यंदा जून महिन्यातही उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण न झाल्याने निकालाला लेटमार्क लागला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे पुनर्मूल्यांकनाचा आकडाही वाढला आहे. १९ सप्टेंबरला विद्यापीठाने ४७७ सर्व निकाल जाहीर केल्याची घोषणा केली. पण, ही घोषणा फोल असल्याचे पुढच्या काही दिवसांत उघड झाले. कारण, तब्बल २४ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल आणि अन्य विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यापीठ लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचे फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे निकाल मिळवण्यासाठी आता विद्यार्थी एकवटले आहेत. विद्यापीठाकडून निकाल मिळवण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थी अमेय मालशे याने सांगितले.अमेय म्हणाला, विद्यापीठाने हायटेकची कास धरण्यासाठी विद्यार्थ्यांचा बळी दिला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या नादात हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरचे नुकसान झाले आहे. तसेच, अनेकांना नोकरीची संधी गमवावी लागली आहे. त्यातच पाच महिने उलटूनही विद्यापीठ यावर मार्ग काढू शकत नाही. त्यामुळे आता हे असेच चालू राहिल्यास पुढच्या कोणत्याच परीक्षा विद्यापीठाला घेऊ देणार नाही.
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ न संपल्यानं पुन्हा परीक्षा भवनावर विद्यार्थी धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:44 AM