मुंबई -बोरिवली येथील श्री हरी एज्युकेशनल ट्रस्टच्या सेंट रॉक विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल शनिवारी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे नेण्यात आली होती. कोरोनानंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहाला भेट देणारे सेंट रॉक हे महाराष्ट्रातील पहिले विधी महाविद्यालय आहे. या विधी महाविद्यालयाच्या सर्व भविष्यकालीन वकील विद्यार्थ्यांनी कारागृहाचे अंतर्गत व्यवस्थापन पाहिले व ते अत्यंत रोमांचित झाले.
2020 च्या आठ महिन्यांच्या लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक वर्षात येथील कैद्यांनी शासनाला 4 कोटी 37 लाखांचा महसूल मिळवून दिला. एकही कोरोना रुग्ण नसलेले ते राज्यातील पहिले कारागृह होते. मुख्याध्यापिका ॲड.श्वेताली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड प्रफुल साळवी , ॲड. अर्पिता शिर्के, ॲड. मनीषा पाठक, ॲड. करिष्मा पांडे ,ॲड. नितीन साळवी या प्राध्यापकांनी सहल यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता व येथील विद्यार्थी धनंजय जुन्नरकर यांनी सदर कारागृह भेटीसाठी परवानगी मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केले होते. मुख्याध्यापिका श्वेताली पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले .येथील भेटी नंतर नाशिक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ कारागृह निरीक्षक अशोक कारकर यांचे त्यांच्या शासकीय कार्यालयात श्वेताली पाटील यांनी शाल ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सेनापती बापट आणि साने गुरुजी या कारागृहात वास्तव्यास होते. 1927 आली निर्मिती झालेले हे ऐतिहासिक कारागृह आहे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी याच कारागृहात 1933 साली लिहीले होते . बंदीवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी म्हणून शासनातर्फे प्रयत्न करण्यात येतात. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात 2600 कैदी असून पक्क्या कैद्यांना विणकाम ,सुतारकाम, शिवणकाम, चर्म कला, बेकरी, लोहकाम, धोबी काम ,रसायन, मूर्तिकाम या 9 कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार मिळतो . लोहकाम कारखान्याने 2020-21 मध्ये एक कोटी 68 लाखांसह प्रथम तर सुतार काम कारखान्याने एक कोटी उत्पन्न सह दुसरा क्रमांक मिळवला. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात येरवडा नंतर नाशिक कारागृहाचा दुसरा क्रमांक येतो. निव्वळ शेतीचे उत्पन्न चाळीस लाख आहे.
गळाभेट, फोन कॉलिंग, शिक्षण, आरोग्य ,चांगले जीवन आदी सुविधांमुळे कैदी प्रेरित होऊन काम करत आहेत. लंडनच्या राधास्वामी सत्संग मंडळाने येथील दर्जेदार सतरंज्या नेलेल्या आहेत. राज्यातील निराळ्या ठिकाण होऊन अंगाचे, कपड्याचे साबण, फिनेल, पलंग, खुर्च्यांना प्रचंड मागणी आहे."महाबीज" ह्यांना नाशिक कारागृह बियाणे पुरवते.नाशिक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ कारागृह निरीक्षक अशोक कारकर यांनी विद्यार्थ्यांना येथील कारागृहाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.