मुंबई : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही वाढलेल्या लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आल्या असून त्यांची दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. त्याऐवजी पहिल्या सत्रातील चाचणी परीक्षा , प्रात्यक्षिके व अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जावा असे निर्देश शिक्षण विभागाकडून शाळा व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.परीक्षा न देता पुढच्या वर्गात दहावी व बारावीसाठी प्रवेश मिळणार यामुळे अनेक विद्यार्थी व पालक खुश असले तरी पहिल्या सत्रात अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांना नापास होणार असल्याच्या भीतीने ग्रासले आहे. तर अनेक शिक्षणसंस्थांना नववीतून आणि अकरावीतून यंदा दहावीत पास होणारे विद्यार्थीच निवडण्यात अडचणी निर्माण होणार नसल्याने मोकळे रान मिळाले आहे.
अनेक शिक्षक संघटनांनी देखील या निर्णयाला आपला विरोध दर्शविला आहे. प्रथम सत्रात झालेल्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे अकरावीचा निकाल लावण्याचा आपण जो निर्णय घेतला तो अकरावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. यावर्षी इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रम बदलला, शैक्षणिक वर्षात अनेक सुट्ट्या आल्या, नवीन पाठ्यपुस्तके आली, शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना फारसे न शिकताच पहिली सत्र परीक्षा यंदा द्यावी लागली, त्याचा विपरीत परिणाम गुणांवर झाला आहे. दुसऱ्या सत्रात अकरावीचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिकू लागतात व त्यानंतर होणाऱ्या परीक्षांमध्ये ते चांगले गुण मिळवतात. अखेरीस सरासरीने ते बारावीत जातात. त्यामुळे पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारावर निकाल लावून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला आहे.अकरावीत नापास झालेले विद्यार्थी बारावीत महविद्यालयात न बसता बाह्य विद्यार्थी म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बसतात. त्यासाठी शिक्षण मंडळ प्रचंड फी घेते, विद्यार्थी बाहेर शिकवण्या लावतात , भरपूर पैसा खर्च होतो. त्यामुळे शिक्षण विभागाचा हा निर्णय विद्यार्थी व पालकांना खूप खर्चात टाकणारी असल्याची प्रतिक्रिया कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी दिली.
दुसरीकडे निकाल चांगला लागण्वयासाठी नववीतून दहावीत आणि अकरावीतून बारावीत जेमतेम गुण मिळवून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून केवळ चांगले गुण मिळवणाऱ्या आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करता येणार असल्याने शिक्षण संस्थानाही मोकळे रान मिळणार आहे. पहिल्या सत्रात गुण न मिळाल्याने विद्यार्थी दुसऱ्या सत्रात अभ्यास करून पुढच्या वर्गात प्रवेश मिळवितात मात्र बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याने शाळा व महाविद्यालयांचा निकाल घसरतो. अशा विद्यार्थ्यांना या संस्था मुद्दाम त्याच वर्गात बसवीत असतात, पहिल्या सत्रात कमी गुण मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांना नापास करणे या संस्थाना सहज शक्य होणार असल्याने मंडळाने पुन्हा याचा फेरविचार करावा अशी प्रतिक्रिय आशिष पाटकर या पालकाने दिली. काही विद्यार्थी मात्र या निर्णयाने खुश असून शिक्षण विभागाने हा निर्णय लवकर जाहीर केला असता तर आम्हाला आमच्या बारावीच्या अभ्यासाची तयारी यापूर्वीच करता आली असती असे मत गोखले महाविद्यालयाच्या पेरणा कळंबे या विद्यार्थिनीने दिली.