लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनासोबत ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दहावी-बारावीचे वर्ग वगळून, पहिली ते नववी आणि अकरावीच्या सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिका शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष उपस्थित न राहता, ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील. या संदर्भात सोमवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिका क्षेत्रात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटले असताना मुंबईतील कोरोना रुग्ण आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही रुग्णवाढ होताना लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
स्वतंत्र सूचना नसल्याने शिक्षक संभ्रमात nविद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा पुढच्या महिनाभरासाठी ऑनलाइन सुरू होणार असले तरी त्यांचे ऑनलाइन अध्यापन शिक्षकांनी घरी राहून करावे की शाळांमध्ये येऊन करावे, शाळांमध्ये हजेरी लावायची झाल्यास शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के असावी की १०० टक्के, उपस्थिती नियमित असावी की आळीपाळीने, याबाबत कोणत्याच स्वतंत्र सूचना शिक्षकांसाठी नसल्याने ते संभ्रमात पडले आहेत. nशिक्षकांना शाळेत बोलावून अध्यापन करायला लावणे किंवा घरून अध्यापन करून देणे यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार शाळांचा असणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, या सगळ्यामुळे शिक्षकांपेक्षाही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापक शिक्षक उपस्थितीवरून बुचकळ्यात पडले आहेत.
महापालिका शाळांसह अन्य खासगी शाळांमधील लसीकरणास पात्र विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलावता येईल, असेही पालिकेच्या परिपत्रकात नमूद केले आहे.