विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे 'कला' गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:05 AM2021-06-17T04:05:54+5:302021-06-17T04:05:54+5:30

मुंबई : दहावीचा निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण मिळणार; पण सवलतीचे कला गुण मिळणार की ...

Students will get discounted 'art' marks | विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे 'कला' गुण

विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे 'कला' गुण

Next

मुंबई : दहावीचा निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण मिळणार; पण सवलतीचे कला गुण मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता त्यासंदर्भातील संभ्रम बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे दूर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त म्हणजेच सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालात याची मदत होणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्या कामगिरीप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी तर होतोच शिवाय दहावीच्या निकालात गुणपत्रिकांतही निश्चितच होतो. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे कला संचालनालयाकडून एलिमेंटरी व इंटरमीडिएट या कला परीक्षा आयोजित न केल्याने त्यांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत असे जाहीर करण्यात आले होते. एकीकडे यंदा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या नाहीत तरी त्यांच्या मागील कामगिरीवरून ते गुण देण्याचा निर्णय देण्यात येतो, तर दुसरीकडे कला गुणांचे प्रस्ताव सादर करूनही सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याने शिक्षण विभाग दुजाभाव करीत असल्याची टीका होऊ लागली होती.

यासंदर्भात अनेक निवेदनेही शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. अखेर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपला आधीचा गुण न देण्याचा निर्णय अधिक्रमित करून बुधवारी नवीन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

चौकट

कसे मिळतात सवलतीचे कला गुण

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५ गुण.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण.

तसेच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.

Web Title: Students will get discounted 'art' marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.