‘परीक्षा न देता उत्तीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:47 AM2020-06-29T02:47:37+5:302020-06-29T02:47:54+5:30
आयआयटीसारख्या संस्थांनीही ऑनलाइन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित व व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मुंबई : परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना खचितच समाधान लाभणार नाही असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
एकीकडे राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला असताना राज्यपाल मात्र अजूनही परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. आॅनलाइन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने या विषयावरील वेबिनारचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनास आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनीही ऑनलाइन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित व व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
कालप्रवाहानुसार अनेक गोष्टी बदलत असतात परंतू अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात, असे सांगून नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत, असेही मत राज्यपालांनी परीक्षेचा संदर्भ देताना मांडले. लहान मुलांच्या डोळ्यांचा आरोग्याचा विचार करून लहान्यांच्या अध्यापनासाठी आॅनलाइन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही मत राज्यपालांनी व्यक्तकेले.