विद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 01:04 AM2020-09-11T01:04:34+5:302020-09-11T06:40:51+5:30
एमसीक्यू पद्धतीने उडाला गोंधळ
मुंबई : एमसीक्यू (बहुपर्यायी उत्तरांचे वस्तुनिष्ठ प्रश्न) पद्धती ही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्याने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने विद्यार्थी पालकांचा गोंधळ उडाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीमुळे अनुत्तीर्ण होण्याची भीती जास्त वाटत असल्याने अनेक संघटना, विद्यार्थी यांच्याकडून प्रश्नसंचाची मागणी होत होती.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना येत्या २ दिवसांत सरावासाठी प्रत्येक विद्यापीठाकडून प्रश्नसंच पुरविण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली.
मुंबई विद्यापीठासह, राज्यातील बहुतांश विद्यापीठे एमसीक्यू पद्धतीचा वापर अंतिम वर्ष परीक्षांसाठी करणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून तर विद्यापीठ अधिष्ठाता, महाविद्यालय प्राचार्य यांनी प्रश्नपेढी तयार करून या परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत.
या प्रकारच्या परीक्षा पद्धतीचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रश्नसंच सरावासाठी मिळणार असले तरी या प्रश्नसंचातीलच प्रश्न परीक्षांना विचारले जाणार का? त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, असे प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत.
दरम्यान, विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश दिल्याप्रमाणे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी क्लस्टर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता यांना तयारी करावी लागणार आहे.
आधीच परीक्षांच्या नियोजनाची सर्व जबाबदारी, शिवाय प्रश्नपत्रिकांचे एमसीक्यू स्वरूप, ते सेट करण्याची जबाबदारी असताना प्रश्नसंचाची आणखी एक जबाबदारी आल्याने प्राचार्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी विद्यापीठाकडून प्राचार्यांना अधिकचे मानधन मिळणार का? असा प्रश्न काही प्राचार्यांकडून उपस्थित होत आहे.
सर्व विद्यापीठांमध्ये एकच परीक्षा पद्धती
विद्यार्थ्यांना वेठीस न धरता सर्व विद्यापीठांसाठी एकच पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. पुणे,औरंगाबाद आणि मुंबईसारखी विद्यापीठे फक्त एमसीक्यूला (बहुपर्यायी परीक्षा) पर्याय म्हणून पाहत आहेत. यातून विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे कामच सुरू आहे. विद्यापीठांनी ऑनलाइन किंवा संकरीत पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, यामध्ये विद्यार्थ्यांना ई-मेल अथवा व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाऊ शकते. विद्यार्थी ते दिलेल्या पद्धतीत त्या घरबसल्या सोडवू शकतील. १०० गुणांच्या पेपरचे विभाजन करताना ५० गुण बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नांना द्यावेत. त्यासाठी दीड तासाचा वेळ द्यावा. ३० गुण ओपन चॉईस असेंसमेंट आणि २० गुण प्रात्यक्षिकांना द्यावेत, अशी मागणी मासूचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली.