मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या लहान बाळांमधील प्रतिजैविकांबाबत महापालिकेने अभ्यास सुरु केला आहे. अर्भकांना कोरोनावरील लस देण्याचा विचार झाल्यास या अभ्यासाचा उपयोग होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी दिली.
कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात अशी चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाबाधित गर्भवती मातांपासून काही नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केलेल्या अर्भकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या शरीरातील प्रतिजैविकांची तपासणी करण्यात येणार आहे. या अर्भकांच्या शरीरात प्रतिजैविक तयार झाली आहेत का? हे तपासले जाणार आहे. या अभ्यासचा वापर भविष्यात बालकांना लस देण्याचा विचार झाल्यास त्यासाठी करता येऊ शकतो, असे काकाणी यांनी सांगितले. सध्या १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
चौकट
पालिकेने कोविड काळात म्हाडा तसेच इतर प्राधिकरणांकडून इमारती ताब्यात घेतल्या होत्या. या इमारतींमध्ये कोविड केंद्र तसेच विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले होते. कोरोना नियंत्रणात असला तरी हे केंद्र बंद करण्यात येणार नाही. ३१ मार्च २०२१ नंतर त्यावेळीच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.