Join us

फ्लूची लस घेतलेल्या व्यक्तींच्या आरोग्याचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:06 AM

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन डॉक्टरांचे संशोधनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. अशा स्थितीत ...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन डॉक्टरांचे संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. अशा स्थितीत संसर्ग नियंत्रणाचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. एका बाजूला संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मागील वर्षभरात सामान्य फ्लूची लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? या फ्लूच्या लसीमुळे त्या व्यक्तीत कोरोनाविरोधातील प्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे का? याचा संशोधनपर अभ्यास राज्यातील दोन डॉक्टर करीत आहेत.

याविषयीचा संशोधनपर अभ्यास बारामतीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल मोकाशी आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते करीत आहेत. तर विकास काकडे या संशोधनपर अभ्यासात सांख्यिक अहवालाची जबाबदारी पाहत आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले की, डॉ. मोकाशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी डॉ. शब्बीर कायमखानी आणि फक्रुद्दिन बोहरी या बोहरा समुदायातील तज्ज्ञांकडून, मागील वर्षापासून कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून समुदायातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फ्लूची लस दिल्याचे सांगितले. परिणामी, या समुदायात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आले असून, मृत्युदर अत्यंत अल्प असल्याचे निरीक्षणात आढळले. या पार्श्वभूमीवर माहितीच्या आधारानुसार, डॉ. मोकाशींसह एक महत्त्वाचा अभ्यास संशोधन करण्याचे ठरविले.

डॉ. अन्नदाते यांनी सांगितले, या संशोधन अभ्यासात ज्या व्यक्तींनी मागील वर्षभरात फ्लूची लस घेतली, त्यांच्याशी संवाद - संपर्क साधून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता का? संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता किती होती? सामान्यतः फ्लूची लस घेतल्यानंतर किती काळाने संसर्ग झाला? कोरोना संसर्गाचे स्वरूप काय होते? अतिजोखमीचे आजार आहेत का? फ्लूची लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे का? अशा विविध स्वरूपाची माहिती जमा करण्यात येत आहे. या संशोधनपर अभ्यासात नागरिकांनी सहभागी होण्यासाठी त्यांनी जर ३० जानेवारी २०२० नंतर फ्लूची लस घेतली असेल आणि त्यांचे वय २० वर्षांच्या पुढे असेल तर त्यांनी reachme@amolannadate.com वर मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

......................