मुंबई : ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी नव्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात या नव्या कोरोना विषाणू संदर्भातील संशोधनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत सप्टेंबर महिन्यापासून संग्रहित केलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.नव्या कोरोना विषाणूचे निदान करण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणतीही विशेष चाचणी उपलब्ध नाही. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले, ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आम्ही येथील प्रयोगशाळेत सप्टेंबरच्या वेगवेगळ्या कालावधीत जमा केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह स्वॅबचा पुनर्अभ्यास करणार आहाेत. त्या नमुन्यांतील एस जेन या घटकाविषयी संशोधनात्मक पातळीवर अभ्यास करून पुढील निष्कर्षासाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.
विविध विषाणू करू शकतात एकाच व्यक्तीला संक्रमितकोरोना विषाणूत अशा प्रकारचा बदल (म्युटेशन) सामान्य बाब आहे. इन्फ्लूएंझाप्रमाणे विविध विषाणू एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतात. यामधून हायब्रिड व्हायरसची निर्मिती होऊ शकते. चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा SARS-CoV-2 मध्ये बदल पाहायला मिळाले होते. मात्र, या बदलांचे स्वरूप लक्षणीय नव्हते. याउलट ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.1.1.7 ची जेनेटिक लक्षणे पाहता कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये मोठे बदल झालेले दिसत आहेत. विशेषत: कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये लक्षणीय बदल दिसत असल्याचे निरीक्षण ब्रिटनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी नाेंदवले आहे.