केरळच्या धर्तीवर होणार राज्यातील नवीन म्युटंटचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:36+5:302021-04-30T04:08:36+5:30
राज्य शासनाला सीएसआयआर देणार अहवाल; भविष्यातील उपाययोजनांसाठी पथदर्शी सीमा महांगडे मुंबई : नवीन म्युटंटसंदर्भात केरळ राज्याने सीएसआयआरशी (वैज्ञानिक व ...
राज्य शासनाला सीएसआयआर देणार अहवाल; भविष्यातील उपाययोजनांसाठी पथदर्शी
सीमा महांगडे
मुंबई : नवीन म्युटंटसंदर्भात केरळ राज्याने सीएसआयआरशी (वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद) सामंजस्य करार करून त्याविषयी माहिती जाणून त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही केली. याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सीएसआयआरशी सामंजस्य करार करून त्याद्वारे मिळणाऱ्या अहवालाचा अभ्यास पुढील कार्यवाहीसाठी करणार आहे. सीएसआयआरकडून करण्यात येणारा म्युटंटचा हा अभ्यास म्हणजे शासनासाठी पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाचा राज्यातील वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या टास्क फोर्समधील सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या पुढाकार व समन्वयातून सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, टास्क फोर्सच्या सदस्यांमध्ये बैठक झाल्यानंतर या सामंजस्य कराराचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात दर आठवड्याला प्रतिजिल्हा २५ म्हणजे महिन्याला १०० एवढे पॉझिटिव्ह ट्रेंडचे नमुने नवीन म्युटंटच्या तपासणीसाठी सीएसआयआरकडे पाठवण्यात येतील. यातील नमुन्यांची संख्या ही प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार बदलू शकते, त्यामुळे ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून निश्चित करण्यात येणार आहे.
सीएसआयआरकडून नवीन म्युटंटचा जो अभ्यास करण्यात येईल तो तीन फेऱ्यांमध्ये होईल. प्रत्येक फेरीसाठी एक महिना याप्रमाणे ३ फेऱ्यांसाठी ३ महिने इतका कालावधी लागणे अपेक्षित आहे. या सर्वांसाठी साधारणतः १.६२ कोटी आणि जीएसटी असा खर्च अपेक्षित असून यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून अंतिम खर्च निश्चित करण्यात येईल. हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाईल.
* विषाणूच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी महत्त्वपूर्ण पद्धत
केरळमध्ये हा सिक्वेन्सिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्प किंवा पद्धतीमुळे कोणत्याही महामारीच्या काळात रोगकारक विषाणू कसा आणि कुठे उत्परिवर्तित होताे, याचा अभ्यास केला जातो. सध्याच्या परिस्थितीत SARS- CoV-2 या विषाणूंवर ही पद्धत वापरली जाणार असून कुठल्याही विषाणूच्या अभ्यासासाठी, त्याच्या निरीक्षणासाठी वापरली जाणारी ही महत्त्वपूर्ण पद्धत आहे. महाराष्ट्र राज्याने आणि सीएआयआर - आयजीआयबी (इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटर्ग्रेटिव्ह बायोलॉजी) हे संयुक्तरित्या हा प्रकल्प राबविणार आहेत.
- डाॅ. शेखर मांडे,
महासंचालक, सीएसआयआर
...............................................